अखेर ‘कागद’ हद्दपार! आता प्रशासकीय कामकाजात ‘ई ऑफिस’प्रणाली | पुढारी

अखेर ‘कागद’ हद्दपार! आता प्रशासकीय कामकाजात ‘ई ऑफिस’प्रणाली

नगर : पुढारी वृत्तसेवा : प्रशासकीय कारभार गतीमान आणि पेपर लेस करण्यासाठी आता नगर झेडपीनेही ‘ई-ऑफीस प्रणाली कार्यान्वित केली आहे. त्यामुळे आता मनुष्यबळ, वेळ आणि कागदावरील खर्चही वाचणार आहे, शिवाय तक्रारींचे डिजीटल ट्रॅकिंग शक्य होणार आहे. कालपासूनच सामान्य प्रशासन विभागाने आपला सर्व कारभार हा संबंधित प्रणालीव्दारे सुरू करत ई ऑफीसचा जणू श्रीगणेशा केला आहे. येत्या महिनाभरात टप्प्याटप्प्याने सर्वच विभाग ऑनलाईन प्रणालीने जोडले जाणार आहेत.

जिल्हा परिषदेमध्ये दररोज 300 पेक्षा अधिक टपालांची आवक-जावक नोंद होते. त्यासाठी कर्मचार्‍यांच्या हस्ते पारंपारीक पद्धत टपाल संबंधित विभागाच्या टेबलवर पोहचवले जात होते. त्यामुळे अनेकदा टपाल विभागप्रमुखांपर्यंत पोहचलले नसत, कधी कधी टपाल गहाळ होत, तर कधी कर्मचार्‍यांनाही टपालाचं काय केलं, याची माहिती नसल्याचे पुढे येत. त्यामुळे या सर्व प्रकाराला पायबंद घालतानाच ई ऑफीस प्रणाली सुरू करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे हे आग्रही होते. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी याकामी लक्ष केंद्रीत करत ई प्रणाली सुरू करण्यासाठी महत्वपूर्ण भुमिका बजावली.

काय आहे ई ऑफीस प्रणाली

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाच्या प्रवेशव्दाराजवळ ई ऑफीस प्रणाली कार्यान्वित करणारे युनिट स्थापन करण्यात आले आहे. या ठिकाणी सात ते आठ कर्मचारी तैनात असणार आहेत. येथे आवक-जावकची ई ऑफीस प्रणालीवर स्कॅनिंग करून नोंदही केली जाईल. पोहच देताना त्यावर ऑनलाईन नोंद झालेला डिजीटल क्रमांकही असेल. त्यामुळे या क्रमांकावरूनच आपल्या तक्रारीची, इतर अर्जाचे पुढे काय झाले, हे ट्रॅकिंग करणे सुलभ होणार आहे. संबंधित टपाल हे ज्या त्या विभागाच्या रजिस्ट्रेशनवर पाठविले जाणार आहे. त्या विभागातही स्वतंत्र टेबल असून, तेथील कर्मचारी हा आपल्या विभागप्रमुख आणि त्या पुढे आवश्यतेनुसार कॅफो,अतिरिक्त सीईओ, सीईओ, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे संबंधित फाईल संगणकावरूनच पुढे पाठविणार आहेत.

विभागप्रमुखांसह कर्मचार्‍यांना प्रशिक्षण

ई ऑफीस प्रणालीबाबत ‘यशदा’ने सर्व विभागप्रमुख आणि कर्मचार्‍यांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले आहे. तसेच जिल्हा प्रकल्प अधिकारी रवींद्र आंधळे यांनी संबंधितांना प्रत्याक्षिकाव्दारे ई ऑफीसचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे ही प्रणाली वापरणे सर्वच विभागांना सहज शक्य होणार आहे.

सामान्य प्रशासन ठरला पहिला ई विभाग!

सामान्य प्रशासन विभागाचा कारभार पूर्णपणे ई प्रणालीव्दारे सुरू झाला आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळके यांनी ऑफलाईन पद्धतीने आलेले टपाल नाकारण्याचा निर्णय घेतला असून, केवळ ई प्रणालीव्दारेच प्रशासकीय कारभार व्हावा, अशा सक्त सूचना केल्या आहेत. त्यामुळे या विभागात ‘ई’ कारभार सुरू झाल्याचे दिसले.

महिनाभरात सर्वच विभागातून ‘ई’ प्रणाली धावणार!

सध्या सर्वच विभागात ‘ई’ प्रणाली सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी युजर आयडी बनविले जात आहेत. तक्रार अर्जासंदर्भात स्वतंत्र डॅशबोर्ड बनविण्यात येत आहे. त्यावरच सर्व कार्यवाहीचा आढावा येरेकर, लांगोरे हे घेणार आहेत. आता ग्रामपंचायत आणि शिक्षण विभागाची तयारी पूर्ण झाली असून, आठवडाभरात हे दोन विभाग ‘ई’ प्रणालीने जोडले जातील. त्यानंतर उवर्रीत विभागही यात सामाविष्ट होतील.

सीईओंच्या मार्गदर्शनात आपण जिल्हा परिषदेतही ‘ई ऑफीस प्रणाली’ कार्यान्वित करतो आहोत. प्रायोगिकतत्वावर या प्रणालीव्दारे आवक-जावकची कार्यवाही सुरू केलेली आहे. लवकरच सर्व विभाग हे ई ऑफीस प्रणालीव्दारे कामकाज करताना दिसतील.

– राहुल शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी

हेही वाचा

Back to top button