Weather Update : सावधान ! उन्हाचा चढला ‘पारा’, तापमानानं गाठली चाळीशी | पुढारी

Weather Update : सावधान ! उन्हाचा चढला 'पारा', तापमानानं गाठली चाळीशी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर शहराचा पारा सलग तिसर्‍या दिवशी राज्यात सर्वोच्च ठरला. शहराचे तापमान शनिवारी 43.4, रविवारी 42.6 तर सोमवारी 42.2 अंशांवर गेला होता. दरम्यान, राज्यात 11 एप्रिलपर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मात्र, गेल्या चोवीस तासांत राज्यात मोठ्या पावसाची नोंद नाही. राज्यातील कमाल तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच असून सध्या कमाल तापमान टिपेला आहे. सोमवारी बहुतांश शहरांचे तापमान 40 अंशांवर गेले होते. गेले तीन-चार दिवस राज्यात मोठ्या पावसाचा अंदाज देण्यात येत आहे. मात्र, विदर्भात अगदी तुरळक भागात हलक्या पावसाने हजेरी लावली. राज्यात इतरत्र कुठेही पाऊस पडला नाही. त्यामुळे राज्यात उष्णतेची लाट तीव्र आहे.

मराठवाडा, विदर्भात पावसाचा इशारा

गेले चार दिवस संंपूर्ण राज्यात पावसाचे अलर्ट दिले जात होते. मात्र, यातून कोकण व मध्य महाराष्ट्राची शक्यता कमी झाली आहे. मध्य महाराष्ट्रात 11 एप्रिलपर्यंतच पावसाचा अंदाज आहे. मात्र विदर्भ, मराठवाड्यात 13 एप्रिलपर्यंत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

सोमवारचे कमाल तापमान

सोलापूर 42.2, पुणे 38.5, कोल्हापूर 38.6, मुंबई 33.5, अहमदनगर 38.8, महाबळेश्वर 33.6, मालेगाव 41.4, नाशिक 36.4, सांगली 40, सातारा 38.8, छत्रपती संभाजीनगर 37.4, धाराशिव 40, परभणी 39.4, नांदेड 40.2, बीड 40, अकोला 39.2, अमरावती 36.2, चंद्रपूर 39.8.

हेही वाचा

 

Back to top button