बाबर आझम म्हणाला, भारतात अपेक्षेहून जास्त प्रेम मिळाले | पुढारी

बाबर आझम म्हणाला, भारतात अपेक्षेहून जास्त प्रेम मिळाले

रावळपिंडी, वृत्तसंस्था : पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम याने भारतात पार पडलेल्या वन-डे विश्वचषकाबद्दल भाष्य केले असून, भारतात अपेक्षेहून जास्त प्रेम मिळाले, असे त्याने म्हटले आहे.

पाकिस्तानी संघ आगामी काळात मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने एका पॉडकास्टला मुलाखत दिली. यावेळी बाबरने भारतात पार पडलेल्या वन-डे विश्वचषकाबद्दल भाष्य केले. बाबरने भारतीय चाहत्यांचे आभार मानताना म्हटले की, मला वाटले नाही की, भारतात आपल्याला एवढे प्रेम मिळेल. मी पहिल्यांदाच भारतात जात होतो, तेथील काहीच माहिती नव्हती; पण आम्ही त्यांच्या धरतीवर पाऊल ठेवताच ज्या पद्धतीने आमचे स्वागत करण्यात आले ते अप्रतिम होते.

बाबर म्हणाला, तो एक वेगळाच अनुभव होता. लोकांनी अपेक्षेपेक्षा खूप प्रेम दिले, हैदराबाद विमानतळावर मोठ्या उत्साहात आमचे स्वागत झाले. आमच्या सराव सामन्यांमध्येदेखील प्रेक्षकांनी हजेरी लावली. संपूर्ण स्टेडियम खचाखच भरले होते. तो वेगळा क्षण होता. संपूर्ण स्टेडियम निळ्या रंगाने भरले होते. आम्ही भारतात खेळत होतो, त्यामुळे हे साहजिकच होते; पण इतर ठिकाणी आम्ही काही भावनिक क्षण अनुभवले, असेदेखील बाबरने सांगितले.

भारतात पार पडलेला वन-डे विश्वचषक 2023 म्हणजे पाकिस्तानी संघासाठी एक वाईट स्वप्नच. बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानला या स्पर्धेत अफगाणिस्तानकडूनदेखील पराभव पत्करावा लागला. विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर बाबरला कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने काही मोठे निर्णय घेत निवड समितीसह कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला. मग शाहिन आफ्रिदीला टी-20, तर शान मसूदला कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात आले; पण आता पुन्हा एकदा बाबर आझमवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेला 18 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. आगामी मालिकेसाठी न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला असून, केन विल्यमसनसह काही वरिष्ठ खेळाडू या मालिकेला मुकले आहेत. ते ‘आयपीएल’मध्ये व्यग्र असल्याने पाकिस्तान दौर्‍यावर जाणार नाहीत.

Back to top button