कोल्हापुरात उच्चांकी सुवर्णगुढी!

कोल्हापुरात उच्चांकी सुवर्णगुढी!

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासूनच्या सोने-चांदीच्या दरात होत असलेल्या वाढीचे सातत्य आजही कायम राहिले. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाकडून मिळालेल्या माहितीनुसार गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा जीएसटीसह दर 73 हजार 200 रुपये झाला आहे.

सोने-चांदीच्या दरात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर पाडव्याच्या खरेदीवर दरवाढीचा परिणाम होण्याची शक्यता सराफ वर्तवत आहेत. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी सांगितले की, पाडव्याच्या मुहूर्तावर थोडे का होईना, सोने खरेदी करायचे, असा अनेक कुटुंबांचा कल असतो.

त्यामुळे कमी बजेटमध्ये बसणार्‍या कमी वजनाच्या दागिन्यांना ग्राहक वर्गाची अधिक पसंती आहे. त्यासाठी खास लाईटवेट दागिन्यांची रेंज उपलब्ध आहे.

तनिष्क कोल्हापूरचे प्रसाद कामत म्हणाले, आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे सोन्याचे दर वाढत आहेत. ही वस्तुस्थिती असली तरी गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याचे महत्त्व कायम आहे. सोने आज वाढले असले तरी पुढे आणखी वाढ होणार असते. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याला सर्वाधिक पसंती देत आहेत. गेल्या सहा महिन्यांत सोन्याच्या दरात 15 हजार रुपयांची वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये सोने 58 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर विकले जात होते.

सराफ व्यवसायातील तज्ज्ञांच्या मते अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याज दर कपातीची शक्यता, जगभरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या भुराजकीय अस्थिरता, जगातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये सुरू असलेली युद्धे, वाढता तणाव याचा प्रभाव सोन्याच्या किमतीवर होत आहे. चिनी सरकार आणि चिनी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर सोन्यात गुंतवणूक करत आहेत. भारतात सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. भारतीय रुपयात होणारी घसरण सोन्याच्या दरवाढीला कारणीभूत ठरत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news