तळजाई टेकडीवरील पाणवठे कोरडेठाक; वन विभागाच्या दुर्लक्ष | पुढारी

तळजाई टेकडीवरील पाणवठे कोरडेठाक; वन विभागाच्या दुर्लक्ष

कसबा पेठ : पुढारी वृत्तसेवा : सहकारनगर परिसरातील तळजाई टेकडी ही एक उद्यान आणि वन्यजीव राखीव म्हणून विकसित केलेली टेकडी आहे. अनेक बदके आणि मोरांचे निवासस्थान असलेली तळजाई टेकडी पाहण्यासाठी अनेक पक्षीनिरीक्षक, पक्षीतज्ज्ञ आणि व्यायामप्रेमी या टेकडीला भेट देतात. मात्र, वन विभागाच्या दुर्लक्षामुळे टेकडीवरील पाणवठे ऐन उन्हाळ्यात कोरडेठाक पडले असून, तळजाई टेकडी ओसाड झाली आहे.

एप्रिल महिन्याच्या अतिउष्णतेने अंगाची लाहीलाही होत असताना तळजाई टेकडीवरील वन्यजीवांसाठी बनविण्यात आलेले पाणवठे कोरडे पडल्याने त्यांचा फटका वन्यजीवांना बसला आहे. वन विभागाकडून काळजी न घेतल्याने पक्षीनिरीक्षक व पक्षीतज्ज्ञांची पदरी निराशाच येत आहे. जैवविविधतेने समृद्ध अशी तळजाई टेकडी अनेक स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षित करते. पण तळजाई टेकडीवरील जैवविविधतेची निगा न राखल्याने ही टेकडी ओसाड झाल्याचे ठिकाठिकाणी पाहावयास मिळत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.एका कर्मचार्‍याने सांगितले की, तळजाई टेकडीवरील पाणवठ्यांतून गळती होत असल्याने त्यात पाणी राहत नाही. पाणी झिरपत असल्यामुळे सध्या पाणवठे कोरडे पडल्याचे दिसून येत आहे.

तळजाई टेकडीवरील तळ्यातील पाणी टँकरने फिरवून पाणी पाणवठ्यात टाकत असतो. येथील पाणवठ्यात पाणी टाकण्यास राहिले असेल, माहिती घेऊन सांगतो.

– दीपक पवार, अधिकारी, वन विभाग

हेही वाचा

Back to top button