अभिमानास्पद ! विद्यापीठाला आयुष मंत्रालयाचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ | पुढारी

अभिमानास्पद ! विद्यापीठाला आयुष मंत्रालयाचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आरोग्यशास्त्र विभागास ‘आयुष सेंटर ऑफ एक्सलन्स’ या प्रकल्पाकरिता नुकतेच अर्थसाहाय्य मंजूर केले आहे. हा प्रकल्प भारत सरकारच्या राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र व भारती विद्यापीठाचे औषधशास्त्र महाविद्यालय यांच्या सहकार्याने सुरू होत आहे. या प्रकल्पाची माहिती देताना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भारतीय ज्ञानशाखांच्या संशोधन व प्रशिक्षणात अग्रेसर आहे.

जग अनेक समस्यांनी ग्रस्त असताना आयुर्वेद व योग यांच्या ज्ञानाचा वारसा अभ्यासणे आवश्यक आहे. विद्यापीठातील आरोग्यशास्त्र विभागाबरोबरच जैव माहितीशास्त्र, प्राणिशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र हे विभागही या प्रकल्पात सहभागी आहेत. याद्वारे आयुर्वेदाच्या आंतरशाखीय संशोधनास चालना मिळेल. राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. मोहन वाणी म्हणाले, आधुनिक साधनांच्या साहाय्याने आयुर्वेदाच्या संकल्पना व औषधांचा अभ्यास या प्रकल्पात अभ्यासाला जाईल. आयुर्वेदाच्या औषधांचा सांध्यांच्या विकारामध्ये होणारा उपयोग तसेच आयुर्वेद चिकित्सेने शरीरातील जीवाणुंवर होणारा परिणाम या प्रकल्पात अभ्यासला जाणार आहे.

भारती विद्यापीठाचे औषधशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आत्माराम पवार म्हणाले, हा प्रकल्प खर्‍या अर्थाने नवीन शैक्षणिक धोरणाच्या एकत्रित संशोधन संकल्पनेचे उत्तम उदाहरण आहे. बायोटेक्नॉलॉजी, फार्मसी, मॉलिक्युलर बायोलॉजी, हेल्थकेअर अशा क्षेत्रांतील सर्व तज्ज्ञ एकत्र येत असल्यामुळे उत्तम संशोधन यातून होणार आहे, असे त्यांनी नमूद केले. विद्यापीठातील आरोग्यशास्त्र विभाग सुमारे 25 वर्षे आयुर्वेद व योग संशोधनात अग्रेसर आहे. विभागातील प्रा. भूषण पटवर्धन यांनी संशोधनाची सुरुवात केली. या विभागाने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे प्रकल्प सिद्धीस नेले आहेत. प्रा.पटवर्धन हे आयुष मंत्रालयाचे राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक तसेच या प्रकल्पाचे मार्गदर्शकदेखील आहेत.

आयुर्वेदाची ज्ञानपरंपरा व अत्याधुनिक विज्ञान यांच्या परस्पर संवादाची आज आवश्यकता आहे. हा संवाद संशोधन रूपाने विकसित व्हावा याकरिता हा प्रकल्प मोलाची भूमिका पार पाडू शकतो. ‘आयुष सेंटर ऑफ एक्सलन्स’ हा सन्मान विद्यापीठास दुसर्‍यांदा मिळाला असून, विद्यापीठाच्या कार्याचा हा गौरव आहे.

– डॉ.भूषण पटवर्धन, प्रकल्प मार्गदर्शक.

हेही वाचा

Back to top button