राज्यात 108 लाख टन साखर उत्पादन तयार.. | पुढारी

राज्यात 108 लाख टन साखर उत्पादन तयार..

पुणे :  पुढारी वृत्तसेवा : राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम अखेरच्या टप्प्यात असून, 169 साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. सद्य:स्थितीत 10 कोटी 56 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. तर 10.24 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 108 लाख 19 हजार टनाइतके साखरेचे उत्पादन तयार झालेले आहे. 15 एप्रिलपर्यंत हंगाम संपुष्टात येण्याची अपेक्षा साखर आयुक्तालयातून वर्तविण्यात आली.
विभागनिहाय स्थिती पाहिली, तर कोल्हापूर विभागात 3, पुणे विभागात 6, सोलापूरमध्ये 6, अहमदनगर 9, छत्रपती संभाजीनगर 4, नांदेड 6, अमरावती 1, नागपूर 3 मिळून 38 कारखाने अद्यापही सुरू आहेत.

गतवर्षी 4 एप्रिलअखेर राज्यात 10.53 लाख टन ऊस गाळप होऊन 9.98 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 105 लाख 15 हजार टनाइतके साखर उत्पादन तयार झाले होते. याचा विचार करता गतवर्षापेक्षा आत्ताच तीन लाख टनांनी साखर उत्पादनात वाढ झाली आहे. अद्यापही हंगाम सुरू असल्याने साखर उत्पादनात आणखी वाढ अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

कोल्हापूर अग्रस्थानी

कोल्हापूर विभागाने सर्वाधिक ऊस गाळप, साखर उत्पादन आणि उतार्‍यामधील आपले अग्रस्थान कायम ठेवले आहे. या विभागात 240.72 लाख टन ऊस गाळप पूर्ण केले, तर सर्वाधिक 11.57 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 278.6 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे. तर 233.29 लाख टन ऊस गाळप पूर्ण करून पुणे विभाग दुसर्‍या स्थानावर आहे. 244.44 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे.

हेही वाचा

Back to top button