विद्यार्थ्यांना दिलासा ! परीक्षा शुल्कमाफी प्रस्तावांसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ | पुढारी

विद्यार्थ्यांना दिलासा ! परीक्षा शुल्कमाफी प्रस्तावांसाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे विभागीय शिक्षण मंडळाने याबाबतचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ दिली असून, शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये 12 एप्रिलपर्यंत शुल्कमाफीचे प्रस्ताव सादर करू शकतील. दुष्काळग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीच्या प्रस्तावांसाठी 28 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना प्रस्ताव सादर करण्यात अडचणी आल्याने मुदतवाढीची मागणी पुणे जिल्हा मुख्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने पुणे विभागीय शिक्षण मंडळाकडे केली होती.

या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय शिक्षण मंडळाने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना येत्या 12 एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ दिली. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांनी तातडीने संपर्क साधून पात्र विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाइन पद्धतीने राज्य मंडळ कार्यालयाला 12 एप्रिलपर्यंत सादर करावी, असे मंडळाचे विभागीय सचिव औदुंबर उकिरडे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

Back to top button