कोल्हापूरचे पुरोगामित्व दिल्लीत पाठवा : शरद पवार | पुढारी

कोल्हापूरचे पुरोगामित्व दिल्लीत पाठवा : शरद पवार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लोकसभेची यावेळची निवडणूक देशाला नवी दिशा देणारी आहे. कोल्हापूरला पुरोगामी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे जातीयवादी शक्तींच्या विरोधात कोल्हापूरचा पुरोगामित्व दिल्लीत पाठवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ महासैनिक दरबार येथे रविवारी आयोजित केलेल्या वज्रमूठ सभेत ते बोलत होते.

आ. पाटील म्हणाले, आपल्या चुकीच्या काराभाराची माहिती जनतेसमोर जाऊ नये याची पुरेपूर व्यवस्था केंद्र सरकारने केली आहे. एनसीएल कंपनीकडून शेतकर्‍यांची लूट सुरू आहे. देशात स्मार्ट सिटीच्या नावाने केवळ फसवणूकच झाली. मोठ्या उद्योजकांची 25 ते 30 लाख कोटींची कर्ज माफ करून त्यांच्या भरपाईसाठी सामान्यांच्या खिशात हात घातला जात आहे, विजेच्या दरात वाढ करून सामान्यांच्या खिशावर डल्ला मारला आहे.

कसत असलेल्या जमिनी शेतकर्‍यांच्या नावावर करणार्‍या शाहू महाराज यांनाच तुम्ही काय केले, असे विचारणे कितपत योग्य आहे, असा सवाल आ. पी. एन. पाटील यांनी केला. हातकणंगेलेतील ‘पोपटा’ला व कोल्हापुरातील ‘गद्दारा’ला शिवसेना कार्यकर्ते धडा शिकवतील, असे संजय पवार म्हणाले.

लोकशाही धोक्यात आल्यामुळे एकाधिकारशाही निर्माण होते. त्याचे हुकूमशाहीत परिवर्तन होऊ शकते म्हणून नागरिकांनी जागृती राहणे आवश्यक असल्याचे शाहू महाराज यांनी सांगितले.

यावेळी दिलीप पवार, डॉ. भारत पाटणकर, स्वाती कोरी, अनिल घाटगे, संभाजीराजे यांची भाषणे झाली. सभेस ऋतुराज पाटील, आ. राजू आवळे, आ. जयंत आसगावकर, आ. जयश्री जाधव, माजी आ. संजय घाटगे, सुरेश साळोखे, गोपाळराव पाटील, विजय देवणे, सुनील शिंत्रे, अप्पी पाटील, अतुल दिघे, सतीशचंद्र कांबळे आदी उपस्थित होते.

15 ऑगस्ट रोजी सर्व तालुक्यात कार्यालय

शाहू महाराज खासदार झाल्यानंतर नागरिकांच्या सोयीसाठी दि. 15 ऑगस्टपर्यंत सर्व तालुक्यात कार्यालय सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे केवळ खासदारांच्या पत्रासाठी तालुक्यातील नागरिकांवर कोल्हापुरात येण्याची वेळ येणार नाही, असे आ. सतेज पाटील यांनी सांगितले.

Back to top button