कोल्हापूर : आत्मसन्मान, आत्मविश्वास, आत्मनिर्भरतेचा जागर | पुढारी

कोल्हापूर : आत्मसन्मान, आत्मविश्वास, आत्मनिर्भरतेचा जागर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महिलांचा आत्मसन्मान… आत्मविश्वास अन् आत्मनिर्भरतेचा जागर रविवारी झाला. निमित्त होते, दैनिक ‘पुढारी’ कस्तुरी क्लब, टोमॅटो एफएम यांच्या वतीने आयोजित महिला रॅलीचे. उदंड उत्साह आणि अपूर्व जल्लोषात महिला सक्षमीकरणाचे दर्शन घडवत काढलेल्या या रॅलीद्वारे महिलांनी मराठी नववर्षाचेही थाटात स्वागत केले. ऐतिहासिक दसरा चौकात सकाळी 7 वाजल्यापासूनच महिलांची गर्दी झाली होती. नोंदणी केलेल्या महिलांना कूपन देण्यात येत होते. त्याकरिता त्यांच्या अद्याक्षरानुसार स्टॉलची मांडणी करण्यात आली होती. स्टॉलवर कूपन घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक महिलेच्या चेहर्‍यावर रॅलीची उत्सुकता दिसत होती. कूपन घेऊन महिला फेटे बांधण्यासाठी जात होत्या. फेटे बांधताना त्यांचे चेहरे आणखी खुलत होते.

सकाळी सात वाजल्यापासूनच संपूर्ण मैदानावर सळसळता उत्साह होता. तो उत्साह आर.जे. जाहिद व रसिका खुमासदार शैलीतील निवेदनाने आणखी वाढवत होत्या. कोल्हापूर शहरात प्रथमच होत असलेल्या रॅलीद्वारे नववर्षाचे स्वागत करतानाच ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘नारीशक्तीचा विजय असो’ अशा घोषणांनी दसरा चौक दणाणून गेला. मान्यवरांच्या हस्ते या रॅलीला प्रारंभ होताच, शहरातील प्रमुख मार्गांवर जणू नारीशक्तीच्या सक्षमीकरणाचेच दर्शन कोल्हापूरवासीयांना झाले. प्रारंभापासून असणारा उत्साह संपूर्ण रॅलीत कायम होता. ढोल-ताशांच्या दणदणाटात रॅलीतही महिला घोषणांबरोबर ठेकाही धरत होत्या.

सायलीने वाजवली ढोलकी

सायली सावंत या युवतीने मंचावर ढोलकीवादन कले. सायलीने वाजवलेल्या ठसकेबाज ढोलकीवर उपस्थित महिलांनी ठेका धरला. शिवाजी विद्यापीठातून ढोलकीवादनाचा डिप्लोमा केलेल्या सायलीने कार्यक्रमस्थळी रंगत आणली.

ऐश्वर्या मांडरे जाणार कुलू मनालीला!

नोंदणी करून रॅलीत सहभागी झालेल्या महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. उपस्थित महिलांची प्रचंड उत्कंठा, क्षणाक्षणाला वाढणारी हुरहूर अशा वातावरणात काढलेल्या या लकी ड्रॉच्या ऐश्वर्या मांडरे भाग्यवान विजेत्या ठरला. मवीणा वर्ल्डफच्यावतीने त्यांना आठ दिवसांची कुल्लू मनाली ट्रीप मोफत मिळणार आहे.

सासू-सुना, दिव्यांग महिलाही झाल्या सहभागी

महिलांच्या आत्मसन्मानची ही रॅली होती. यामुळेच या रॅलीत कोणताही भेद दिसला नाही. दीड वर्षाच्या चिमुकलीसह 72 वर्षांपर्यंतच्या महिला सहभागी झाल्या होत्या. सहभागी झालेल्या प्रत्येकीच्या चेहर्‍यावर केवळ आणि केवळ उत्साह, आनंदच ओसांडून वाहत होता. त्यात वयाचा कोणताही अडथळा नव्हता. या रॅलीत सासू-सुना सहभागी झाल्या होत्या. एक दिव्यांग महिलाही दिव्यांगासाठी असलेली मोपेड घेऊन सहभागी होत मी ही सक्षम असल्याचा संदेश देत या रॅलीत सहभागी झाली होती.

सेव वॉटर, सेव द गर्ल

रॅलीत अनेक महिला पाणी बचत, महिला सक्षमीकरण आदीवर भाष्य करणारेफसेव वॉटर, सेव गर्लफ आदी विविध फलक घेऊन सहभागी झाले होते. आपल्या बाईकला आकर्षक पद्धतीने सजवलेले फलक लक्षवेधी ठरत होते. या फलकाद्वारे रॅलीतून महिलांनी विविध संदेश दिले.

मपुढारीफचा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आहे. या महिला बाईक रॅलीसाठी तत्काळ नोंदणी केली. पण लकी ड्रॉचे बक्षीस मला मिळेल याची कल्पना देखील केली नव्हती. लकी ड्रॉ काढताना विजेत्याचे नाव मएफ आणि आडनाव मएमफ पासून सुरु होत आहे असे सांगताच उपस्थितांसह आपलीही उत्कंठा वाढली. आपलेही नाव असेच आहे, आपल्याला बक्षीस लागले तर खुप चांगले होईल, पण अशा नावाच्या अन्य महिलाही असतील, असा विचार करतच असतानाच कानावर ऐश्वर्या मांडरे हे नाव पडले आणि माझ्या आनंदाला पारावारच उरला नाही. महिलांची बाईक रॅली, त्यात बक्षीस यामुळे आमच्या पाडव्याचा आनंद द्विगुणीत झाल्याचे मिरजकर तिकटी येथे एका सर्वसामान्य कुटूंबात राहणार्‍या ऐश्वर्या मांडरे यांनी सांगितले.

कोल्हापुरी फेट्याचा रुबाबच भारी

रॅलीत सहभागी होणार्‍या प्रत्येक महिलेला कोल्हापुरी फेटा बांधण्यात येत होता. फेटा बांधत असताना महिलांना फोटो, व्हिडीओ काढण्याचा आणि फेटा बांधल्यानंतरही फोटो घेण्याचा मोह आवरत नव्हता. कुणी सेल्फी घेत होते तर कुणी वेगवेगळ्या पोज देत कोल्हापूरी फेट्यातील आपले फोटो काढून घेत होते. कोल्हापूरची फेट्याचा रुबाबच भारी, अशा प्रतिक्रिया यावेळी महिला देत होत्या.

मराठी पाऊल पडती पुढे

रॅलीत अनेक महिला ‘मराठी बाणा’, ‘मराठी पाऊल पडती पुढे’ असे फलक घेऊन सहभागी झाल्या होत्या. काही महिला बुलेट, तसेच अन्य मोटारसायकल घेऊनही सहभागी झाल्या होत्या. त्यातून महिला सक्षमीकरणाचे दर्शन घडत होते.

सेल्फी पॉईंटवर गर्दी

रॅलीत सहभागी होणार्‍या महिलांसाठी खास सेल्फी पाँईट उभारला होता. ‘पुढारी’ महिला आत्मसन्मान आणि नववर्ष रॅलीच्या वार्तांकनात मध्यभागी ‘मी’ अशा थीमवर आधारित या सेल्फी पाँईटवर महिलांची गर्दी झाली होती. प्रारंभी आणि रॅलीच्या सांगता समारंभावेळीही या सेल्फी पॉईंटवर महिलांची पावले छायाचित्र काढण्यासाठी वळत होती.

बाईपण भारी, झिंग झिंग झिंगाट..

कार्यक्रमस्थळी ‘बाईपण भारी’, ‘झिंग झिंग झिंगाट’ आदींसह मराठी-हिंदी गीतांवर उपस्थित महिलांनी ठेका धरला होता. रॅली सुरू होण्यापूर्वी आणि रॅलीच्या सांगताप्रसंगी सहभागी सर्वच महिला उत्स्फूर्तपणे नृत्यात दंग झाल्या होत्या.

दुर्गाशक्तीचेच रूप अवतरले!

एका महिलेने रॅलीत आपल्यासोबत आणलेल्या मोटारसायकलवरच करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची मूर्ती आकर्षक पद्धतीने लावली होती. त्याभोवती नेत्रदीपक सजावटही केली होती. करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या सहवासात या रॅलीत सहभागी झालेल्या या महिलेमुळे रॅलीत जणू दुर्गाशक्तीचे रूप अवतरले, रॅलीतील सर्वांनाच जणू आंबामातेचा सहवास लाभला, अशा प्रतिक्रिया अन्य महिला देत होत्या.

Back to top button