सातारा : पवारवाडी ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल : खराडवाडी येथून आणावे लागते पाणी | पुढारी

सातारा : पवारवाडी ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल : खराडवाडी येथून आणावे लागते पाणी

चाफळ : राजकुमार साळुंखे चाफळपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या व नाणेगांव खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पवारवाडी (ता. पाटण) येथील ग्रामस्थांना व न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मधील शिक्षक व मुलांना अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या उन्हाळ्यातही त्यांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी याकामी लक्ष घालून पिण्याच्या पाण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी व शालेय विद्यार्थी यांनी केली आहे.

चाफळ विभागातील नाणेगांव खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पवारवाडी येथील वस्तीत शंभर ते सव्वाशे लोकवस्ती असून अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थांना उन्हाळ्यात व पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. ग्रामपंचायती मार्फत गावातील नदीच्या पात्रात असलेल्या विहिरीतील पिण्यासाठी योग्य नसलेले पाणी इतर खर्चासाठी थोडेफार दिले जाते. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी लहान मुलांपासून वयस्कर मंडळीना पहाटे पासून भटकंती करुन पाणी आणावे लागते.

गावापासून जवळ असलेल्या खराडवाडी येथील गावातून ग्रामस्थांना नळयोजनेचे पाणी आणावे लागत आहे. तेही त्या गावातील ग्रामस्थांचे पाणी भरून झाल्या नंतर मग येथील ग्रामस्थांना पाणी शिल्लक राहिले तर ते मिळते, नाही तर मोकळ्या हाताने घरी भांडी घेऊन जावे लागते.

तसेच न्यू इंग्लिश मीडियम स्कूल नाणेगांवच्या ५० ते ७० मुलामुलींना व ७ शिक्षकांना देखील शाळेत पिण्याच्या पाण्याची कोणतीच सोय नसल्याने घरातूनच पाणी आणावे लागते. शाळेला पाण्याची टाकी आहे. मात्र, त्या टाकीत पिण्यायोग्य पाणी नाही. त्यामुळे या टाकीचा शाळेसाठी तसा काहीच उपयोग होत नाही.

याचा विचार करून ना. शंभूराज देसाई तसेच संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत साळुंखे यांनी याकामी तातडीने लक्ष घालून येथील बस्तीला व शाळेतील मुलांना पाणी मिळू देण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी व शालेय विद्यार्थी यांनी केली आहे.

विद्यार्थी, शिक्षक घरातून आणतात पाणी…

नाणेगाव येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या साधारण ७० विद्याथ्यांना व सात शिक्षकांना पिण्याचे पाणी घरूनच आणावे लागत आहे. शाळेच्या बाजूला बोअर असून पाणी पिण्यायोग्य आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून ती नादुरूस्त असल्याने ते बोअर केवळ शोपीस म्हणून उरले आहे. हे बोअर दुरुस्त करावे अशी मागणी विद्यार्थी व शिक्षकांनी केली आहे.

पवारवाडी येथील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी गावात बोअर मंजूर झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र ते अद्याप मारले गेलेले नाही. पाण्याची पर्यायी व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी
लागत आहे. – अधिक पवार, पवारवाडी सामाजिक कार्यकर्ते

Back to top button