दूधदरात घट; पशुखाद्याची मात्र दरवाढ सुरूच : दूध उत्पादक शेतकरी संकटात | पुढारी

दूधदरात घट; पशुखाद्याची मात्र दरवाढ सुरूच : दूध उत्पादक शेतकरी संकटात

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : मागील वर्षी एप्रिल महिन्यात दुधाला प्रतिलिटर 38 रुपये भाव होता. या वर्षी तो तब्बल 13 रुपये कमी होऊन 25 रुपये इतका झाला आहे. तर, दुसरीकडे पशुखाद्यांच्या किमती मात्र वाढतच आहेत, त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. राज्य सरकारने एप्रिल 2023 मध्ये दुधाला किमान दर 38 रुपये प्रतिलिटर देण्याचे आश्वासित केले होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात प्रतिलिटर 34 रुपये दर निश्चित केला. सप्टेंबर महिन्यापासून दुधाच्या दरात सतत घसरण होऊन जानेवारी 2024 मध्ये अनुदानाच्या माध्यमातून हा दर 30 रुपयांवर आणण्यात आला. मात्र, दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिलिटर 5 रुपये अनुदान योजनेतील दूध अनुदानाचे पैसे अनुदान कालावधी संपूनही जवळपास 20 दिवस झाले तरी बँक खात्यात जमा झाले नाही. शासनाकडून दूध अनुदान कालावधी संपल्यानंतर दूध खरेदीदराचा निर्णय बदलला गेला. 27 रुपये प्रतिलिटर असलेला खरेदीदर 25 रुपयांवर आणला गेला. मात्र, या निर्णयामुळे शेतकर्‍यांना मोठा तोटा झाला. ही बाब तीव्र दृष्काळात दूध उत्पादक शेतकरीवर्गासाठी घातक असल्याची प्रतिक्रिया शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे.

वाढलेले पशुखाद्यांचे दर व चाराटंचाईमुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे. बाजारात पाण्याच्या बाटलीपेक्षाही गायीचे दूध स्वस्त झाल्याने शेतकर्‍यांच्या पदरी शेणाशिवाय हाती काहीच शिल्लक राहत नाही. भरीस भर म्हणून शासन देत असलेल्या प्रतिलिटर 5 रुपये अनुदानाचे निकष बदलल्याने शेतकर्‍यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जानेवारीच्या शासन निर्णयानुसार 3.2 फॅट व 8.3 एसएनएफसाठी 5 रुपये प्रतिलिटर अनुदानाचा निर्णय घेण्यात आला. यानंतर 2 महिन्यांनी अनुदानाचा फेरविचार केल्यानंतर 13 मार्चच्या मंत्रिमंडळ बैठकीत 3.5 फॅट व 8.5 एसएनएफसाठी 25 रुपये दर
देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दूध उत्पादक शेतकर्‍यांवर आर्थिक संकट घोंघावत आहे. –

विक्रमसिंह भोसले, दूध उत्पादक शेतकरी, वाल्हे

पेंड, भुसा, भरडा आदी पशुखाद्याच्या 50 किलोच्या एका पिशवीच्या किमतीत वर्षभरात 200 रुपयांनी वाढ झाली आहे. आता हिरव्या चार्‍यासाठी पाणी नसल्याने कुठेतरी विकत मिळणार्‍या वैरणीचे दर मागील वर्षापेक्षा दीडपटीने वाढले आहेत. त्यातच दूध खरेदीदरात वाढ होण्याऐवजी घट होत आहे. दावणीची जनावरे सोडता येत नाहीत व सांभाळणेही परवडत नाही.

– महादेव चव्हाण, पशुपालक, वाल्हे

दूध उत्पादकाच्या हातात प्रतिलिटर 25 रुपये

दुकानातून गायीचे पिशवीतील दूध सर्वसामान्य ग्राहकांस प्रतिलिटर 52 ते 55 रुपये देऊन खरेदी करावे लागत आहे. मात्र, दूध उत्पादकाच्या हातात प्रतिलिटर 25 रुपये मिळतात. गायीच्या प्रतिलिटर दुधामागे 27 ते 30 रुपये नफा कमावणारी व्यवस्था दूध उत्पादक व्यवसायाला लागलेली कीड आहे.

हेही वाचा

Back to top button