करामती बंडोबा..! | पुढारी

करामती बंडोबा..!

सध्या राज्यामध्ये आणि एकंदरीत देशामध्ये तिकीट वाटपाची लगबग सुरू आहे. तिकीट, मग ते रेल्वेचे असो, बसचे असो, सिनेमाचे असो, नाटकाचे असो की एखाद्या संस्कृतिक कार्यक्रमाचे असो, तिथे गर्दी ही असतेच. आपल्या पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी सध्या धुमाकूळ सुरू आहे. नाही आपल्या पक्षाचे मिळाले तर पक्ष बदलून पण कोणते ना कोणते तिकीट मिळवण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत.

पक्षाने यादी जाहीर केल्याबरोबर मतदारसंघांमधील इच्छुक उमेदवार बंडखोरी करतात आणि पक्ष नेतृत्वाला फाट्यावर मारून स्वतःची उमेदवारी जाहीर करतात. प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक पक्षामध्ये असे किमान चार-पाच बंडोबा तिकीट वाटप जाहीर झाल्याबरोबर उभे राहत आहेत. असे काही एखाद्या उमेदवाराने केल्याबरोबर पक्षातील जाणते नेते, ज्यांच्या शब्दाला मान आहे किंवा आजकाल ज्यांना चाणक्य संबोधले जाते, ते उभे राहतात आणि बंडोबांच्या बरोबर बैठक करून त्यांना थंडोबा करतात.

हे बंडखोर अशा बैठकांमध्ये काय बोलत असतील असे तुम्हाला वाटते? पहिली गोष्ट म्हणजे बंडखोरीचा झेंडा उभारणे याचे एकापेक्षा अनेक उद्देश असतात 1. आपण लोकसभेच्या उमेदवारीला लायक आहोत असे सिद्ध करणे, 2. अर्थपूर्ण वाटाघाटी करून माघार घेणे. 3. पक्षामध्ये आपली स्वतःची ताकद वाढवून घेणे. 4. आता माघार घेतोय म्हणून विधानसभेचे तिकीट निश्चित करून घेणे. थोडक्यात, म्हणजे आपल्या भविष्यातील राजकारणाचा खुंटा हलवून बळकट करून घेणे हे सर्वत्र सुरू आहे. ‘खुंटा हलवून बळकट करणे’ हा वाक्प्रचार नवीन पिढीला समजणार नाही, यास्तव सोपे करून सांगत आहोत. पूर्वी गायी-म्हशींना बांधण्यासाठी खुंट्या बांधल्या जात. जात्यालाही फिरवण्यासाठी खुंटा असे. हा खुंटा बळकट करायचा असेल तर जमिनीच्या दिशेने जोर देऊन तो वारंवार हलवून बळकट केला जातो. असो.

संबंधित बातम्या

आज बंडाचा झेंडा उभारल्याबरोबर ठरल्याप्रमाणे सर्व प्रक्रिया सर्व पक्षांमध्ये होत आहे. बंडखोर मंडळींना मुंबईला बोलावले जाते. तिथे पक्षश्रेष्ठी बसलेले असतात. पक्षश्रेष्ठी, तिकीट जाहीर झालेला उमेदवार आणि बंडखोर यांची सविस्तर चर्चा होते आणि बंडखोराला शांत करून परत त्याच्या मतदारसंघामध्ये उमेदवाराला विजयी करण्यासाठी काम करण्याचा आदेश दिला जातो. या बैठकीतून बाहेर पडलेला बंडखोर सहसा अत्यंत विजयी मुद्रेने बाहेर पडतो आणि पत्रकारांना ‘व्ही फॉर व्हिक्टरी’चे चिन्ह दाखवतो. याचा अर्थ आपली उमेदवारी माघारी घेऊन त्याने आता पक्षाने तिकीट दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा इरादा जाहीर केलेला असतो. अशा रीतीने हे बंड थंड पडते आणि बंडोबा हे थंडोबा म्हणून ओळखले जातात.

सर्वसाधारण प्रत्येक राजकीय नेत्याचे वरिष्ठ नेत्यांमधील काही लोकांशी व्यक्तिगत संबंध असतात. तिकीट कोणाला फायनल होणार आहे, हे मतदारसंघातील सर्व मोठ्या कार्यकर्त्यांना माहीत असते. फक्त ते जाहीर झाल्यानंतर बंड करण्याचे नाटक केले जाते व अनेक फायदे पदरात पाडून घेतले जातात. बंडाचा झेंडा खाली उतरवून असे बंडखोर पक्षासमोर पांढरे निशाण उभे करतात.

Back to top button