loksabha election : आढळरावांना करावी लागणार नाराजांना सावरण्याची ‘ही’ कसरत.. | पुढारी

loksabha election : आढळरावांना करावी लागणार नाराजांना सावरण्याची 'ही' कसरत..

सुरेश वाणी

नारायणगाव : शिरूर लोकसभा मतदारसंघांतील महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना आघाडीतील अनेक पक्षीय नाराजांना सावरण्याची कसरत करावी लागणार आहे. वीस वर्षांनंतर स्वगृही परतलेल्या आढळरावांना आपल्या पूर्वीच्या घरात झालेले बदल आणि नवी समिकरणे लवकर समजतील तेवढे बरे अशी स्थिती आहे. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव चांगले मित्र पुन्हा जरी एकत्र आले असले तरी त्यांच्या मैत्रीचा फायदा होण्याचे ऐवजी तोटाच अधिक संभवतो. वळसे पाटील आणि आढळराव एकत्र आल्यानेही अनेकांचे हितसंबंध अडचणीत आले आहेत. त्यामुळे वळसे पाटील यांचे सगळेच कार्यकर्ते आढळरावांचे काम करतील असे चित्र दिसत नाही. गेली वीस वर्षे आम्ही शिवाजीराव आढळरावांशी संघर्ष केला आणि अचानक आता निवडणुकीसाठी त्यांच्याशी जुळून घेणं अनेकांना पटलेलं नाही. ’आम्ही आढळरावांचे काम करणार नाही, त्यापेक्षा घरी बसू’ असे अनेक जण सांगतात.

राजगुरुनगरचे आमदार दिलीप मोहिते यांचे आढळराव यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश सोहळा प्रसंगीचे मंचर येथील भाषण बरच काही सांगून जाते. केवळ अजित पवारांच्या सांगण्यावरून मी आढळराव यांच्यासोबत आहे. माझ्यावर अविश्वास व्यक्त केला तर मला दिलीप मोहिते म्हणतात असा इशाराच दिलीप मोहिते यांनी या सभेमध्ये जाहीरपणे अजित पवार आणि वळसे पाटील यांच्या उपस्थितीत दिला होता. त्यांच्या या इशार्‍यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जातात. त्याच सभेमध्ये शिवाजीराव आढळराव यांनी दिलीप मोहिते यांना चुचकारण्याचा जरी प्रयत्न केला असला तरी दोघातील पीळ लगेच संपुष्टात येईल असेही नाही. त्यामुळे शिवाजीराव आढळराव यांना खेड तालुक्यामध्ये फार मेहनत करावी लागणार आहे.

जुन्नर तालुक्यामध्ये तर चित्र फार वेगळे पाहायला मिळत आहे. समोर कोल्हे यांच्या रूपाने स्थानिक उमेदवार असल्यामुळे आढळरावांना जुन्नर मतदारसंघातून मतदान मिळवणं खूप कष्टाचं होणार आहे. जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके महायुती सोबत जरी असले तरी मतदार त्यांचं ऐकतीलच असं नाही. आढळराव गुरुवारी (दि.28) शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आले होते. त्यांच्यासोबत ना जुन्नरचे आमदार दिसले ना कोणी कार्यकर्ते , सुरुवातच जर अशी एकट्याने होणार असेल तर पुढे परिस्थिती कशी राहील, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

एकंदरीत 2019 च्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये शिवाजीराव आढळराव यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. केवळ राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप हे तीन पक्ष एकत्र आले म्हणून आढळराव यांचा विजय सोपा होईल, असं जर कोणाला वाटत असेल तर ते शक्य दिसत नाही. त्याचं कारणही तसंच आहे. जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आहेत. त्यांचे आणि शिवाजीराव आढळराव यांचे ’सबंध’ कसे आहेत हे संपूर्ण जुन्नर तालुक्याला माहिती आहे. त्यामुळे सोनवणे हे आढळरावांचे काम प्रामाणिकपणे करतीलच असं नाही.

केवळ बेनकेंच्या भरोशावर जुन्नर तालुक्यामधून आढळरावांना मताधिक्य मिळण्याची शक्यता दिसत नाही. जुन्नरच्या भाजपच्या नेत्या आशाताई बुचके यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात शिवाजीराव आढळराव यांचा मोठा हात असल्याची चर्चा असल्यामुळे आशाताई बुचके प्रामाणिकपणे आढळरावंच काम करतील का याबाबत सुद्धा उलट सुलट चर्चा होत आहे. शिवाजीराव आढळराव यांना या निवडणुकीमध्ये मोठी मेहनत घेऊन फार कसरत करावी लागणार आहे.

आढळरावांची उमेदवारी महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी जाहीर केली आहे. आढळरावांच्या उमेदवारीचा मार्ग जरी सुकर असला तरी विजय मात्र खडतर आहे, काटे की टक्कर होणार आहे. मागच्या पाच वर्षांमध्ये आढळराव यांनी शिरूर मतदारसंघामध्ये जनसंपर्क निश्चित चांगला ठेवला होता. परंतु त्यांनी वारंवार पक्ष बदलल्याने मतदारात काही प्रमाणात नाराजी आहे. तीन वेळा खासदार होताना बाळासाहेब ठाकरेंच्या मोठ्या सभांनी आढळरावांना मोठा हातभार दिलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाऊन विकासाची कामे केली असली तरी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिलेला पाठिंबा अनेकांना रुचलेला नाही.

हेही वाचा

‘उजनी’त फोफावला वाळू उपसा..

बिबट्याच्या हल्ल्यात ६ शेळ्यांचा मृत्यू : तीन जखमी; १ पळवली

पाण्याअभावी सुकला नारळ; नगामागे भाव सहा ते आठ रुपयांनी वधारले

Back to top button