‘उजनी’त फोफावला वाळू उपसा.. | पुढारी

‘उजनी’त फोफावला वाळू उपसा..

भरत मल्लाव

पुणे : उजनी धरणात वाळू उपशाला पूर्ण बंदी असताना बेकायदा वाळू उपशाने आता पुन्हा डोके वर काढले आहे. या बेकायदा वाळू उपशाला आता हद्दीच्या पळवाटेचे चांगले कारण सापडले आहे. इंदापूर महसूल व पोलिस कारवाईला गेले तर म्हणे ते करमाळा, कर्जत, माढा या भागांत पळून जातात. आम्हाला कारवाई करण्यात हद्दीची अडचण येते आणि त्या भागातले अधिकारी मूग गिळून गप्प असतात. मग जर इथे जबाबदार अधिकारीच हद्दीवरून एकमेकांकडे बोटे दाखवत या धंद्याला अप्रत्यक्ष खतपाणी घालून पाठबळ देत आहेत.

प्रशासनाच्या या बोटचेपेपणामुळे तर गुन्हेगारीला बळकटी मिळून ती रक्तरंजित झाल्याशिवाय राहत नाही, हे उजनीच्या वाळू व्यवसायने यापूर्वी अनेक प्रकरणांतून दाखवून दिले आहे. दौंड व भिगवण येथील गोळीबार व हत्या, यातील जिवंत उदाहरणे आहेत. अगदी अधिकार्‍यांना मारण्याचे प्रकार विसरता येत नाहीत. अशा परिस्थितीत हद्दीच्या पळवाटा शोधण्यापेक्षा संयुक्त कारवाई करून वाळू उपशाचा बीमोड करणे, त्याचे कंबरडे मोडणे, त्यावर रामबाण उपाय असताना सर्व विभागांच्या अधिकार्‍यांची उत्तरे ही कायद्याची विटंबना करणारी आणि कायद्याला पांगळे बनविणारी वाटतात.

सर्वच विभागांच्या अधिकार्‍यांचे माफियांशी असणारे मैत्रीपूर्ण व अर्थपूर्ण संबंधांमुळे वाळूमाफिया निडर बनून आपली हुकमत आणि दहशत मच्छीमार, शेतकरी व सामान्य नागरिकांवर पसरवत आहेत. कोणाचाही बाप येऊ द्या, आमचे काहीही बिघडत नाही, असे चॅलेंज छातीठोक माफिया देत असल्याने त्यांना किती मोठा राजाश्रय आणि अधिकार्‍यांची साथ मिळत असावी, हे यातून स्पष्ट होते. आजमितीला भीमानगर, शहा, कंधार, सुरली आदी भागांत राजरोसपणे बेकायदेशीर वाळू उपसा केला जात असुन, यासाठी हद्दीचा पुरेपूर वापर केला जात आहे. यामध्ये माफियांना लपण्यासाठी करमाळा, वाळू काढण्यासाठी इंदापूर, तर काढलेली वाळू खाली करण्यासाठी माढा तालुक्याचा शिराळ, ढोकरी, कंधार आदी भागांचा वापर केला जात आहे. हा सर्व प्रकार उजनी प्रदूषणवाढीला जेवढा घातक आणि जबाबदार तेवाढच तो गुन्हेगारीलाही बळकटी देणारा आणि भविष्यात थेट कायदा व सुव्यवस्थेलाच सुरुंग लावणारा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विशेषतः एका बाजूने उजनी प्रदूषणामुळे लाखो नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना दुसर्‍या बाजूने मुठभर गुन्हेगार व माफियांना पोसण्याची सर्वच अधिकार्‍यांची बोटचेपी भूमिका अवैध धंद्याला बळ देणारी ठरत आहे. उजनीत कायद्याला अक्षरशः कमजोर समजले जात असल्याने संघटित गुन्हेगारांच्या टोळक्या धुडगूस घालत आहेत, हे जळजळीत वास्तव आहे आणि सामान्य माणूस मात्र भयभीत अवस्थेत आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे देशाचे व राज्याचे नेतृत्व करणार्‍या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात हा खेळ सावल्यांचा सुरू आहे.

हेही वाचा

Back to top button