विद्यार्थ्यांसाठी दिलासा : तळपत्या उन्हामुळे शाळा, मंगळवारपासून सकाळी | पुढारी

विद्यार्थ्यांसाठी दिलासा : तळपत्या उन्हामुळे शाळा, मंगळवारपासून सकाळी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 च्या पार गेला आहे. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने विद्यार्थी, नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा 1 एप्रिलपासून सोमवार ते शनिवार सकाळी साडेसात ते साडेअकरादरम्यान भरविण्यात याव्यात, असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषदेचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिले आहेत. शहरात मात्र दोन सत्रांत चालणार्‍या शाळांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

परीक्षेच्या वेळेत करावा बदल

एप्रिल महिना हा विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा काळ आहे. उन्हाची वेळ टाळून परीक्षा घेण्यात यावी, तसा बदल परीक्षेच्या वेळापत्रकात करण्यात यावा, अशी मागणी झाली आहे. मुलांना उष्माघाताचा त्रास झाला तर त्याचे किमान चार दिवस वाया जातात. दोन सत्रांत असलेल्या शाळांमध्ये बहुतांश लहान मुलांचे वर्ग दुपारी भरविण्यात येतात. ते सकाळी भरविणे गरजेचे आहे. पाचवी ते सातवीच्या वर्गातील परीक्षा सकाळीच घेणे गरजेचे आहे, असे भावे हायस्कूलचे शिक्षक विनोद पारे यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button