अभिनेता मंगेश देसाई यांचं निर्माता म्हणून पदार्पण | पुढारी

अभिनेता मंगेश देसाई यांचं निर्माता म्हणून पदार्पण

पुढारी ऑनलाईन

रंगभूमी, चित्रपट आणि टीव्ही मालिका या माध्यमांमध्ये सशक्त अभिनेता म्हणून मंगेश देसाईनं आपलं स्थान निर्माण केलं आहे.  मंगेश देसाई आता वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहेत. मंगेश देसाई यांनी साहिल मोशन ही निर्मिती संस्था स्थापन केली आहे. निर्माता म्हणून ते पदार्पण करत आहेत.

एक अलबेला, खेळ मांडलासारखे संवेदनशील चित्रपट, क्राईम पेट्रोलसह विविध मालिकांमध्ये मंगेश यांनी अभिनेता म्हणून आपला ठसा उमटवला आहे. विनोदी अभिनेता म्हणून तर त्याची ओळख आहे. अभिनेता म्हणून असलेल्या ओळखीच्या पलीकडे जाऊन मंगेश यांनी निर्माता म्हणून एक चित्रपट हाती घेतला आहे. अतिशय महत्त्वाकांक्षी असा हा चित्रपट आहे.

ठाण्यात या चित्रपटासाठी झालेल्या निवड चाचणीला इतकी गर्दी झाली की तीन सभागृह घेऊन निवड चाचणीचं आयोजन करावं लागलं. मराठी चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पण करण्यासाठी मंगेश यांनी कोणता विषय निवडला आहे, चित्रपटाचं नाव काय, लेखक, दिग्दर्शक, कलाकार कोण ही सगळीच माहिती अजून गुलदस्त्यात आहे.

चित्रपट निर्मितीविषयी मंगेश म्हणाले, की एवढी वर्षं अभिनय केल्यानंतर काहीतरी वेगळं करून पाहायची इच्छा होती. त्यामुळे आता चित्रपट निर्मितीमध्ये पाऊल टाकलं आहे. कारण अभिनयाइतकीच चित्रपट निर्मितीही आव्हानात्मक काम आहे.

आतापर्यंत विनोदी असो किंवा गंभीर भूमिका, मी माझं काम नेहमीच संवेदनशीलतेनं करत आलो. आता तीच संवेदनशीलता निर्माता म्हणून माझ्या पहिल्या निर्मितीतही प्रेक्षकांना दिसेल हा विश्वास आहे. चित्रपटाचे सर्व तपशील योग्य वेळी जाहीर करणार आहे.

हेही वाचलं का?

Back to top button