loksabha election : अंत्यविधी, लग्नाला हजेरी म्हणजे खासदार, आमदार नव्हे | पुढारी

loksabha election : अंत्यविधी, लग्नाला हजेरी म्हणजे खासदार, आमदार नव्हे

बापू रसाळे

ओतूर : राजकारण करताना हल्ली हात जोडून समाजात वावरण्याची ‘क्रेझ’ रूढ झाली आहे. निवडणुकांपुरतेच जनता जनार्दन, मतदार बंधू-भगिनी यांचेशी एकप्रकारे भावनिक नाते जोडून मते मागण्याचा व मी तुम्हाला ओळखतोचा अविर्भाव बळेच आणून मते मागितली जात आहेत. निवडून आल्यावर मात्र मतदारांच्या साध्या ओळखीलाही ठेंगा दाखवणारे नेते निवडणूक काळात पुकारलेल्या घोषणा बासनात गुंडाळून पाच वर्षांसाठी जनतेपासून फरार झाल्याचे व जनतेच्या समस्यांना तिलांजली देणारे नेते प्रत्येक निवडणुकीत मतदारांना बघायला मिळाल्यामुळे एक मोठी उदासीनता मतदारांमध्ये आहे, त्याचे पडसाद येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेतून बघायलाही मिळतील.

उमेदवारांनी आत्मपरीक्षण करून जनतेच्या मागण्या पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे. मागणीनुसार पुरवठा न झाल्यास त्याचा विपरीत परिणाम निवडणूक निकालांमधून नक्कीच पाहायला मिळणार आहे, यात शंकाच नाही. दशक्रिया विधी,अंत्यविधी, लग्नसमारंभ, वाढदिवस यातून नेत्यांनी भाषणबाजी करण्याचा पायंडा आणि एक टूम ग्रामीण भागात सध्या सुरू आहे, इतकेच केले म्हणजे मतदार आपल्याला हिशेबात धरतील, असा गोड गैरसमज नेते मंडळीत पसरला असला तरी ग्रामीण भाग आता बर्‍यापैकी साक्षर झाला आहे. निवडून येणारा उमेदवार किती क्षमतेने जनसेवा करणार आहे, याचे अंदाज मतदार बांधू लागले आहेत.

शेतकरी वर्गाच्या उत्पादित मालाला मिळणारे तुटपुंजे बाजारभाव हा मुख्य मुद्दा मनात ठेवून ग्रामीण भागातील मतदार मतदान करणार आहेत. जेव्हा शेतकर्‍यांना व त्यांच्या उत्पादित शेतमालाला दुर्लक्षित करून नेते मते मागतील तेव्हा मतदानातून मोठा संताप व्यक्त होणार असल्याची चर्चा अणे माळशेज पट्ट्यातील गावांमधून व्यक्त होत आहे. हल्ली मोठ्या प्रमाणात महागाईने डोके वर काढले आहे, महागाईच्या तुलनेत ना कांद्याला भाव ना शेतमालाला भाव तर दुधाला मिळणारा बाजारभाव अतिशय तुटपुंजा आहे. परिणामी शेतकरी आत्महत्याच्या घटना घडत आहेत. तो बेभानपणे कर्जबाजारी होत आहे. त्यामुळे त्याचा अवघा परिवार अडचणीत सापडत आहे, हे आणि अशा प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी कोणताही नेता प्राधान्यक्रम देत नाही, अशी खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

पूर्वी लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी निवडणुका लढवल्या जात असत, मात्र आता निवडणुकीची केवळ शर्यत उरली असल्याचे बोलले जात आहे, किती हजार कोटी खर्च केला यावर उमेदवार मोठा की लहान हे ठरत असले तरी आदिवासी पट्ट्यातील अनेक गावांमध्ये तहानेने व्याकूळ झालेली पाळीव जनावरे या नेत्यांना दिसणार का? महिला रोजगार बुडवून हजारो फुटांची दरड उतरून एक हंडाभर पाणी पिण्यासाठी घेऊन येते, तिच्या दररोजच्या पाण्यासाठीच्या यातना व आटापिटा या नेत्यांना कधी दिसणार? या प्रकारचे संतप्त सवाल आदिवासी पट्ट्यातील मतदार विचारू लागले आहेत.

क्षणा क्षणाला मरणयातना भोगणारा मजूरवर्ग, बांधकाम क्षेत्रातील मजूर, ऊसतोड कामगार, मार्केटमध्ये हमाली करणारे कामगार, शेतात उन्हातान्हात राबणारा अल्पभूधारक शेतकरी, हातावर पोट असणारे सर्व छोटे व्यावसायिक या सर्व घटकात निवडणूक प्रक्रियेबाबत मोठी उदासीनता आहे. त्याचा सर्व फटका या निडणुकीत बसल्याशिवाय राहणार नाही, अशी एक तीव्र भावना ग्रामीण भागातील मतदारांमध्ये आहे तर जनतेच्या समस्या सोडवणारा खासदार, आमदार असावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा

Back to top button