पनामात सापडला 1200 वर्षांपूर्वीचा खजिना | पुढारी

पनामात सापडला 1200 वर्षांपूर्वीचा खजिना

पनामा : पनामा देशात तब्बल 1200 वर्षे जुना खजिना सापडला आहे. यामध्ये सोन्यासह अनेक अशा गोष्टी सापडल्या आहेत, जे पाहून पुरातत्त्व शास्त्रज्ञही हैराण झाले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोने आणि जवळपास 32 मृतदेहांचे अवशेष सापडले आहेत. या 32 जणांचा बळी देण्यात आला असावा, असा अंदाज लावला जात आहे.

पनामा शहरापासून जवळपास 110 मैल लांब एल कॅनो आर्कियोलॉजिकल पार्कमध्ये हा शोध लागला आहे. यामध्ये सोन्याची शॉल, बेल्ट, दागिने आणि व्हेलच्या दातांपासून तयार करण्यात आलेले कर्ण आभूषण अशा अनेक मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. या वस्तू कोकल संस्कृतीतील एका उच्च पदावरील व्यक्तीसोबत पुरण्यात आल्या असाव्या, असे अधिकारी मानतात. समाजाच्या प्रमुखाला मृत्यूनंतरच्या प्रवासात आराम मिळावा यासाठी 32 जणांचा बळीही देण्यात आला होता, असेही सांगितले जात आहे. या मृतदेहांची अचूक संख्या माहिती करून घेण्यासाठी त्यांचा पूर्ण तपास केला जात आहे.

या खजिन्याची किंमत खूप जास्त आहे, असे पनामाच्या संस्कृती मंत्रालयाच्या लिनेट मोंटेनेग्रो यांनी सांगितले. जिथे हा खजिना सापडला ते थडगं 750 इसवीतील असून एका उच्चपदस्थ पुरुष नेत्यासाठी ते तयार केलं गेलं असावं, असं सांगितलं जातं. त्या पुरुषाचा मृतदेह एका महिलेच्या मृतदेहावर ठेवून पुरण्यात आला होता. ही तेव्हा अभिजात वर्गातील लोकांना पुरण्याची प्रथा होती. या थडग्यात सापडलेल्या इतर वस्तूंमध्ये बांगड्या, मानव आकृती असलेले कानातले आभूषण, मगरीचा मृतदेह, घंटी, कुत्र्याच्या दातांपासून तयार करण्यात आलेले स्कर्ट, हाडांपासून तयार केलेली बासरी आणि मातीच्या भांड्यांचा समावेश आहे.

Back to top button