Loksabha election | शिरूर लोकसभा निवडणुक लढत होणार चुरशीची | पुढारी

Loksabha election | शिरूर लोकसभा निवडणुक लढत होणार चुरशीची

अभिजित आंबेकर

शिरूर : शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे, त्याचा परिणाम शिरूर तालुक्यात झाला आहे. जे शिवाजीराव आढळराव मागच्या वेळेस राष्ट्रवादीच्या विरोधात उभे होते, ते आता त्यांचे उमेदवार आहेत, तर जे डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते ते आता विरोधात असणार आहेत, या दोघांत शिरूर तालुक्यात मताधिक्य घेण्यासाठी तुल्यबळ लढत होईल. मागील लोकासभेत शिवाजीराव आढळराव पाटील यांना शिरूर शहराने साथ देत 500हून अधिक मताधिक्य दिले होते. डॉ. अमोल कोल्हे यांची लोकप्रियता असतानाही आढळराव यांनी घेतलेले मताधिक्य त्या वेळेस महत्त्वाचे होते. शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांना 1 लाख 2 हजार 87 एवढे मतदान झाले होते, तर आढळराव यांना 98 हजार 732 एवढे मतदान झाले होते. म्हणजेच कोल्हे यांनी 26 हजार 805 मतांची आघाडी घेतली होती.

आज परिस्थिती उलटी आहे. आढळराव हे शिवसेनेत असून त्यांना महायुतीच्या माध्य्मातून राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळली आहे. शिरूर तालुक्यात यामुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत. आढळरावांसोबत भाजप व शिवसेना असेल, उलट डॉ. अमोल कोल्हे हे महाविकास आघाडीकडून असून, त्यांच्यासोबत आमदार अशोक पवार, शिवसेना (उबाठा) व काँग्रेस हे पक्ष असतील. अमोल कोल्हे हे मतदारसंघात, तसेच शिरूर तालुक्यात फिरकलेच नाहीत, असा आरोप त्यांचे विरोधक करत असले तरी त्याला जोरदार उत्तर कोल्हे यांनी दिले आहे. आजच्या परिस्थितीत दोघांमध्ये जबरदस्त चुरस असून, ही निवडणूक अटीतटीची होणार आहे हे नक्की. आता सुरुवात झाली असून प्रत्यक्षात निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल.

हेही वाचा

Back to top button