शिरवली, कांबळेश्वरचा पाणी प्रश्न मिटणार; जलजीवन योजनेचे 40 टक्के काम पूर्ण | पुढारी

शिरवली, कांबळेश्वरचा पाणी प्रश्न मिटणार; जलजीवन योजनेचे 40 टक्के काम पूर्ण

सांगवी : पुढारी वृत्तसेवा : शिरवली-कांबळेश्वर जलजीवन योजनेचे काम वेगात सुरू आहे. या योजनेचे सध्या 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. असाच कामाचा वेग सुरू राहिला तर येत्या दहा महिन्यांत योजना पूर्ण होऊन शिरवली व कांबळेश्वर गावांतील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे उपअभियंता राजकुमार जाधव यांनी दिली. बारामती तालुक्यातील शिरवली, कांबळेश्वर, शिरष्णे, लाटे व माळवाडी या गावांना पिण्याचा पाणीपुरवठा करणारी प्रादेशिक योजना आहे. पाच गावांच्या लोकसंख्येच्या तुलनेत ही योजना अपुरी पडत असल्याने पाच किंवा सहा दिवसांआड पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत असते.

दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या व अपुरी पडणारी योजना लक्षात घेऊन तालुक्याचे लोकप्रतिनिधी या नात्याने उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यात सुमारे 25 जलजीवन योजनांसाठी 700 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली. यामध्ये शिरवली व कांबळेश्वर गावांसाठी या योजनेत सुमारे 25 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. या योजनेला जून 2022 मध्ये तांत्रिक मंजुरी मिळाली. प्रशासकीय मान्यता ऑगस्ट 2022 मध्ये मिळाल्याची माहिती जाधव यांनी दिली.

या योजनेच्या साठवण तलावाची क्षमता 3.20 कोटी लिटरची असून, तलावाचे काम 50 टक्के झाले आहे. पाच पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार असून, मागील आठवड्यात शिरवली येथे टाकीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच दोन्ही गावच्या पाणीवितरणासाठी 39 किलोमीटर अंतरावर जलवाहिनी टाकण्यात येत आहे. या योजनेसाठी निरा डावा कालव्यातून पाणी उपलब्ध होण्यासाठी जुलै 2023 मध्ये मंजुरी प्राप्त झाल्याचे पंचायत समितीचे माजी सभापती करण खलाटे यांनी सांगितले.

ही योजना वेळेत पूर्ण होणार असून, ती कार्यान्वित झाल्यानंतर शिरवली व कांबळेश्वर गावांतील नागरिकांना नियमितपणे वेळेवर पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

– अनुपकुमार तावरे, प्रकल्प अभियंता

हेही वाचा

Back to top button