Loksabha election 2024 | बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष! | पुढारी

Loksabha election 2024 | बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष!

दौंड : पुढारी वृत्तसेवा : लोकसभेच्या निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष शरद पवार यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे. बारामती लोकसभेची जागा जिंकण्याचा चंगच भारतीय जनता पक्षाने केला आहे. ‘ए फॉर अमेठी’नंतर ‘बी फॉर बारामती’ ही भाजपची घोषणा आहे. परंतु, भाजपला बारामती काबीज करणे एवढे सोपे नाही. भाजपला केवळ शरद पवार यांचा पराभव करायचा आहे, असे नुकतेच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. परंतु, त्यांच्यापुढे बरीच आव्हाने आहेत. या वेळची निवडणूक नणंद-भावजयमध्ये होत असली, तरी शरद पवार गट व अजित पवार गट यांचे कार्यकर्ते द्विधा मन:स्थितीत आहेत, हे आजतरी पाहायला मिळते आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात मागील काही वर्षांपासून सुप्रिया सुळे यांनी मतदारांशी थेट संपर्क ठेवल्याने त्यांना मानणारा वर्ग देखील आहे, तर सुनेत्रा पवार ह्या केवळ मागील काही दिवसांपूर्वी दौंड शहरात एकदाच येऊन गेल्या आहेत. यापूर्वी त्या दौंड येथील विठ्ठल मंदिर येथे आल्या होत्या, त्यामुळे त्यांचा दौंडशी फारसा संबंध नाही. बारामतीची ही लोकसभेची लढत लक्षवेधी असली, तरी सुप्रिया सुळे यांची दमछाक करणारी ही निवडणूक नक्कीच आहे.

2019 च्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांना 6,86,714 एवढी मते मिळाली होती, तर त्यांना भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी जोरदार लढत दिली होती. कांचन कुल यांना 5 लाख 30 हजार 940 एवढी मते मिळाली होती, तर वंचित बहुजन आघाडीचे नवनाथ पडळकर यांना 44 हजार मते मिळाली होती. परंतु, 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होण्याची शक्यता आहे. यामध्ये विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (शरद पवार गट), सुनेत्रा पवार (अजित पवार गट) व वंचितकडून उभे राहणार असल्याचे ओबीसींचे नेते महेश भागवत यांचे देखील आव्हान आहे. दौंड तालुक्यात ओबीसी मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत, त्याचा फटका दोघींनाही बसू शकतो, असे तरी आजचे चित्र आहे.

येणार्‍या काळात दौंडमध्ये नागरिकांच्या अडचणीचे ठरलेले मुद्दे ऐरणीवर येऊ शकतात. यामध्ये दौंड रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटर दूर झालेली नवीन कॉर्ड लाइन व तिथे कोणत्याही सोयीसुविधा नसल्यामुळे प्रवाशांचे होत असलेले हाल, दौंड-पुणे प्रवास करणार्‍या अनेक प्रवाशांची अनेक दिवसांपासून असलेली मागणी विद्युतीकरण पूर्ण होऊन देखील अद्यापही विद्युत लोकल सुरू झाली नाही, दौंड शहरात जुन्या लोकोशेडच्या जागी नव्याने बांधण्यात आलेल्या इलेक्ट्रिक शेडचे काम अजूनही बाकी असून, पाण्याअभावी ते बंद आहे, दौंड शहराचा विकास न झाल्यामुळे उद्ध्वस्त झालेली बाजारपेठ, वाढती बेरोजगारी, शहर व रेल्वेच्या परिसरात वाढती गुन्हेगारी हे मुद्दे येणार्‍या निवडणुकीमध्ये कळीचे ठरू शकतात.

विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर बरीच आव्हाने आहेत. त्या कशा पद्धतीने नागरिकांच्या या प्रश्नांवर पुढील काळात काम करतील, हे पाहणे गरजेचे आहे, तर सुनेत्रा पवार यांचे दौंडकरिता कोणतेही ठोस असे काम नाही. केवळ अजित पवार यांना मानणारे काही गट त्यांच्या पाठीशी आहेत. भाजपची ताकद त्यांना मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडे आपली हक्काची जवळपास 50 ते 60 हजार मते आहेत. पूर्ण मतदारसंघातही चिन्ह घड्याळ असल्यामुळे कितपत घड्याळाला मतदान होते, हे पाहणे गरजेचे आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड शहर व तालुक्यात जोरदार मतदारांशी संपर्क सुरू केला आहे. पण, सुनेत्रा पवार यांनी केवळ दौंडचा एकच दौरा केला आहे, त्यामुळे येणार्‍या काळात प्रचारात कोण बाजी मारते, हे पाहणे गरजेचे आहे.

हेही वाचा

Back to top button