कालव्याला संरक्षक कठडे बांधणार कधी? नागरिकांचा सवाल | पुढारी

कालव्याला संरक्षक कठडे बांधणार कधी? नागरिकांचा सवाल

अनिल दाहोत्रे

महर्षिनगर : गुलटेकडी परिसरातील डायस प्लॉट येथे कालव्यालगत नागरी वस्ती दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, या कालव्याला संरक्षक कठडे नसल्याने गेल्या काही वर्षांत अनेक नागरिकांना जीव गमवावे लागले आहेत. याकडे पाटबंधारे विभाग व महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, कालव्याला कठडे बांधणार तरी कधी? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

परिसरातील कालव्यालगत वस्त्या, झोपडपट्ट्या असल्याने नागरीकरण दिवसेंदिवस वाढत आहे. या वस्त्यांमध्ये महापालिका प्रशासन पाणी, ड्रेनेज, रस्ते, स्वच्छतागृह आदी मूलभूत सुविधा पुरवते; मग कालव्यावर संरक्षक कठडे बांधून नागरिकांचे जीव का वाचवू शकत नाही? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. महापालिकेत आता प्रशासकराज असताना देखील संरक्षक कठडे बांधणीचे काम पूर्ण झाले नसल्याने रहिवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

महापालिका प्रशासन हे काम पाटबंधारे विभागाचे असल्याचे सांगत आहे, तर कालव्यालगतच्या नागरिकांना महापालिकेने मूलभूत सुविधा दिल्या; मग कठडे का बांधले जात नाहीत? असे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे. पाटबंधारे विभाग व महापालिका प्रशासनाने समन्वयातून कालव्यावर कठडे उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

कठडे उभारण्याकडे दुर्लक्ष

माजी नगरसेविका कविता वैरागे म्हणाल्या की, कालव्यावर कठडे नसल्याने अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. महापालिका नागरी सुविधाअंतर्गत रहिवाशांना मूलभूत सुविधा देत आहे. मात्र, नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या परवानगीने कालव्यावर कठडे बांधणे आवश्यक आहे. याबाबत पाठपुरावा सुरू आहे. मात्र, पाटबंधारे विभागाचे नाव पुढे करीत याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

डायस प्लॉट परिसरातील कालव्यावर संरक्षक कठडे नसल्याने गेल्या काळात अनेक नागरिकांना जीव गमवावे लागले आहेत. यामुळे पाटबंधारे विभाग व महापालिकेने कालव्यावर कठडे उभारण्याची गरज आहे.

– लक्ष्मण जगधाने, रहिवासी

कालव्यावर कठडे बांधण्याचा विषय हा पाटबंधारे विभागाच्या अखात्यारीतील आहे. यामुळे महापालिका यात काही करू शकत नाही.

– प्रदीप आव्हाड, सहायक आयुक्त, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय

कालव्याची जागा पाटबंधारे विभागाची असली, तर परिसरातील नागरिकांना महापालिकेने मूलभूत सुविधा दिल्या आहेत. या सुविधा पाटबंधारे विभागास विचारून दिलेल्या नाहीत; मग महापालिका कालव्यावर संरक्षक कठडे का बांधून देऊ शकत नाही?

– मोहन भंडारे, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग

हेही वाचा

Back to top button