सहकारी संस्थांची पदाधिकारी निवड रखडली?

सहकारी संस्थांची पदाधिकारी निवड रखडली?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हवेली तालुक्याच्या थेऊरमधील यशवंत सहकारी साखर कारखान्यासह राज्यातील निवडणुका होऊन पदाधिकारी निवड बाकी असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या किंवा कसे? याबाबतचे मार्गदर्शन शासनाकडून मागविण्यात आले आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने शासनाकडे पत्र पाठविले असून, त्यावर येणार्‍या मार्गदर्शनानुसार पदाधिकारी निवडीच्या विषयावरील पुढचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले. राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील, त्या टप्प्यावर स्थगित करून दिनांक 31 मे 2024 पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने फेब्रुवारी महिनाअखेर घेतला.

मात्र, त्यामध्ये ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीच्या अर्ज प्रक्रियेचा टप्पा (नामनिर्देशन टप्पा) सुरू झालेल्या तसेच ज्याप्रकरणी सर्वोच्च व उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशित केले आहे, अशा सहकारी संस्थांना निवडणूक स्थगितीतून वगळण्यात आले होते.त्यामध्ये नामनिर्देशनाचा टप्पा सुरू झालेल्या सुमारे 1100 सहकारी संस्था तसेच सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होणार्‍या संस्थांच्या निवडणुका सुरू राहतील, अशी माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणातील सूत्रांनी त्याचवेळी स्पष्ट केली होती. आता या संस्थांच्या निवडणुका होऊन पदाधिकारी निवड होणे बाकी आहे.

त्यामध्येच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झालेली आहे. त्यामुळे थेऊरमधील यशवंत कारखान्यासह अन्य ठिकाणच्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांनंतर पदाधिकारी निवडणूक घ्यायची किंवा कसे? याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने शासनाकडून मार्गदर्शन मागविल्याचे समजते. ते उपलब्ध झाल्यानंतरच संबंधित सहकारी संस्थांच्या पदाधिकार्‍यांची निवड होणार किंवा कसे? याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. येत्या एक-दोन दिवसांत शासनाकडून याबाबतची माहिती येणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

  • लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागल्याचा परिणाम
  • राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने शासनाकडून मागविले मार्गदर्शन
  • थेऊरमधील यशवंत साखर कारखान्यासह संस्थांचा समावेश

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news