“…हा तर हिंदूंच्‍या श्रद्धेचा अपमान” : राहुल गांधींच्या ‘त्‍या’ विधानावर भाजपचा हल्लाबोल | पुढारी

"...हा तर हिंदूंच्‍या श्रद्धेचा अपमान" : राहुल गांधींच्या 'त्‍या' विधानावर भाजपचा हल्लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काँग्रेसच्‍या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपा निमित्त इंडिया आघाडीने रविवार,१७ मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर शक्‍तीप्रदर्शन केले. तसेच लोकसभा प्रचाराचे बिगुलही फुंकले. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर चौफेर टीका केली. त्‍यांनी ‘शक्ती’ शब्‍द वापरत आपण एका शक्तीशी लढत आहोत, असे संबोधले होते. यावरुन भाजपने आज ( दि. १८ मार्च ) राहुल गांधींवर निशाणा साधला.

काय म्‍हणाले होते राहुल गांधी?

मुंबईतील जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी म्‍हणाले की,. पंतप्रधान नरेंद्र मोदी “ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) शिवाय निवडणूक जिंकू शकत नाहीत. हिंदू धर्मात ‘शक्ती’ हा शब्द आहे. आपण एका शक्तीविरोधात लढत आहोत. प्रश्न असा आहे की, ही शक्ती काय आहे? राजाचा आत्मा ‘ईव्हीएम’मध्ये आहे. हे सत्य आहे. राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. आणि देशातील प्रत्येक संस्थेत ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभागात आहे. नुकतीच महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेस पक्ष सोडला. त्‍यापूर्वी ते नेते माझ्या आईसमोर रडत म्हणाले की, ‘सोनियाजी, मला लाज वाटते की, या शक्तीशी लढण्याची ताकद माझ्यात नाही. मला तुरुंगात जायचे नाही.’ अशा प्रकारे हजारो लोकांना धमकावण्यात आले आहे,” असा आरोपही यावेळी राहुल गांधी यांनी केला होता.

“…हा तर हिंदूंच्‍या श्रद्धेचा अपमान” : भाजपचे प्रवक्ते पूनावाला

राहुल गांधी यांच्‍या आरोपला प्रत्‍युत्तर देताना सोशल मीडियावर शेअर केलेल्‍या व्‍हिडिओमध्‍ये भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला म्हणतात की, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे वक्तव्य हिंदूंच्‍या श्रद्धेचा अपमान आहे. हिंदू धर्मात शक्ती नावाची गोष्ट आहे. राहुल गांधी म्‍हणतात आम्ही शक्तीशी लढतोय. हा केवळ हिंदू धर्माचा अपमान नाही तर नारी शक्तीच्‍या  विरोधात असलेल्या राहुल गांधींची कुरूप मानसिकता दर्शवते.

आपल्या सर्वांना माहित आहे की, इंडिया आघाडीतील मित्रपक्ष उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माच्या निर्मूलनासाठी आवाहन केले होते. तर द्रमुक नेते ए राजा म्हणाले की ते प्रभू रामाशी लढत आहेत. या दोन्‍ही नेत्‍यांवर कोणतीही कारवाई करण्‍यात आले. ‘इंडिया’ आघाडीतील नेते सातत्‍याने हिंदू धर्मावर टीका करत आहेत. तसेच काँग्रेस पक्षाला प्रभू रामाचे अस्तित्व नाकारण्यापासून ते शक्तीबद्दल विधान करण्यापर्यंत हिंदू द्वेषाचा मोठा इतिहास आहे, असा आरोपही पुनावाला यांनी केला आहे.

‘एखादी व्यक्ती दुसऱ्याचा द्वेष करते याला काही तरी मर्यादा असावी’

राहुल गांधींच्या “शक्ती” या शब्‍दांवर टीका करताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, “एखादी व्यक्ती दुसऱ्याचा द्वेष करते अशी काही तरी मर्यादा असावी. राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींबद्दल तीव्र द्वेष आणि त्यांच्या कौटुंबिक स्थितीचे अहंकारी प्रदर्शन सर्व मानवी मर्यादा ओलांडले आहे.”

Back to top button