कोल्हापूर : आचारसंहिता लागू; प्रशासन सज्ज | पुढारी

कोल्हापूर : आचारसंहिता लागू; प्रशासन सज्ज

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक जाहीर होताच आचारसंहिताही लागू करण्यात आली. आचारसंहितेची कडक अंमलबजावणी तत्काळ सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित सर्व यंत्रणांना दिले.

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यांतील 31 लाख 58 हजारांवरील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि आदेशानुसार विविध अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून त्यांच्या सुरू असलेल्या कामांची आजपासून गती वाढली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच, जिल्हाधिकारी तथा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीला हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, विविध विभागांचे अधिकारीही उपस्थित होते.

महिला, तरुण आणि दिव्यांग कर्मचार्‍यांची 59 मतदान केंद्रे

जिल्ह्यातील 3359 मतदान केंद्रांपैकी 30 केंद्रे मॉडेल केंद्र म्हणून कार्यरत असतील. 10 केंद्रांवर फक्त महिला कर्मचारी कार्यरत असतील. 10 मतदान केंद्रांवर तरुण कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जाणार आहे तर 9 मतदान केंद्रे केवळ दिव्यांग कर्मचार्‍यांची असतील.

17 हजार 68 ईव्हीएमची एफएलसी पूर्ण

जिल्ह्यात निवडणुकीसाठी उपलब्ध झालेल्या सर्व 17 हजार 68 ईव्हीएमची एफएलसी (फर्स्ट लेवल चेकिंग) पूर्ण झाली आहे. यापैकी 12 हजार 967 ईव्हीएम मतदानासाठी वापरण्यात येणार आहेत. यापैकी आवश्यकता आणि राखीव धरून 4 हजार 219 बीयू (बॅलेट युनिट), 4 हजार 219 सीयू (कंट्रोल युनिट) आणि 4 हजार 547 व्हीव्हीपॅटचा समावेश आहे.

उमेदवारांची माहिती ‘केवायसी’ अ‍ॅपवर मिळणार

निवडणुकीतील सर्व उमेदवारांची माहिती आता केवायसी अ‍ॅपवर मिळणार आहे. उमेदवाराची संपत्ती किती आहे, त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत आदी निवडणूक आयोगाला देण्यात आलेली सर्व माहिती मतदारांना पाहता येणार आहे. याखेरीज मतदान केंद्रांतही उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेविषयक माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे.

आचारसंहिताभंगाच्या तक्रारीवर शंभर मिनिटांत कारवाई

आचारसंहिताभंगाच्या तक्रारी ‘सी व्हिजील’ अ‍ॅपवर कोणालाही करता येणार आहेत. या अ‍ॅपवर दाखल झालेल्या तक्रारीवर पुढील शंभर मिनिटांत कारवाई होणार आहे. निवडणुकीत होणार्‍या पैशाच्या गैरवापराबरोबर ड्रग्ज वापरावर विशेष लक्ष राहणार आहे. याकरिता विविध 22 प्रकारच्या यंत्रणा कार्यरत राहणार आहेत. जिल्ह्यात 3368 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यापैकी 177 ठिकाणी नव्याने रॅम्प उभारले जाणार आहेत. 2999 मतदान केंद्रांवर स्वच्छतागृहे आहेत. 12 ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील आहेत. 69 ठिकाणी दुरुस्ती केली जाणार आहे. 3314 मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची सोय आहे. 45 ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील व्यवस्था केली जाणार आहे. एकूण मतदार केंद्रांत वाढ होण्याचीही शक्यता आहे.

3368 जिल्ह्यात मतदान केंद्रे

जिल्ह्यात 3368 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यापैकी 177 ठिकाणी नव्याने रॅम्प उभारले जाणार आहेत. 2999 मतदान केंद्रांवर स्वच्छतागृहे आहेत. 12 ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील आहेत. 69 ठिकाणी दुरुस्ती केली जाणार आहे. 3314 मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची सोय आहे. 45 ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील व्यवस्था केली जाणार आहे. एकूण मतदार केंद्रांत वाढ होण्याचीही शक्यता आहे.

पुरुष 16 लाख तर महिला मतदार 15 लाखांवर

जिल्ह्यात 16 मार्चअखेर 31 लाख 58 हजार 513 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 16 लाख 8 हजार 858, महिला मतदारांची संख्या 15 लाख 49 हजार 483 इतकी आहे. तृतीयपंथी 172 मतदार आहेत.

आठ हजार 923 सैनिक मतदार

या निवडणुकीसाठी आठ हजार 923 इतक्या सैनिक मतदारांची नोंद झाली आहे. यामध्ये 8 हजार 672 पुरुष तर 251 महिला मतदारांचा समावेश आहे.

25 हजार 911 दिव्यांग मतदार

या निवडणुकीसाठी मतदार यादीत चिन्हांकित केलेल्या दिव्यांग मतदार म्हणून 25 हजार 911 मतदारांची नोंद आहे. यापैकी 15 हजार 864 पुरुष तर 10 हजार 47 महिला मतदार आहेत.

1680 मतदान केंद्रावर होणार वेब कास्टिंग

जिल्ह्यातील 1680 मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग होणार आहे. यामुळे मतदान केंद्रांवर लक्ष ठेवता येणार आहे. याचे नियंत्रण जिल्हा प्रशासन आणि राज्यस्तरावरही राहणार आहे. याखेरीज जिल्ह्यातील 71 केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

Back to top button