पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणूक निकालाच्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा दावा केला आहे. "तृणमूल काँग्रेस पक्ष (TMC party) पश्चिम बंगालमधील निवडणुकीत अस्तित्वासाठी लढत आहे. यावेळी भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य पश्चिम बंगाल असेल. भाजपला पश्चिम बंगालमध्ये मोठे यश मिळताना दिसत आहे." असे पीएम मोदी यांनी ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही ३ होतो आणि पश्चिम बंगालच्या लोकांनी आम्हाला ८० वर नेले. गेल्या निवडणुकीत आम्हाला प्रचंड बहुमत मिळाले. यावेळी संपूर्ण देशात पश्चिम बंगाल हे सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य असेल. पश्चिम बंगालमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळत आहे. तेथे निवडणूक एकतर्फी आहे. जनता त्याचे नेतृत्व करत आहे. तृणमूलचे लोक वैफल्यग्रस्त झाले आहेत. तेथे हत्येच्या घटना घडत आहेत. निवडणुकीपूर्वी भाजप कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकले जात आहे, असे पीएम मोदी म्हणाले.
दरम्यान, मुस्लिमांसाठी ओबीसी कोट्याबाबतचा कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया यावर बोलताना पीएम मोदी यांनी ममतांवर व्होट बँक राजकारण केले जात असल्याचा आरोप केला. जेव्हा कोलकाता उच्च न्यायालयाचा निकाल आल्यावर एवढी मोठी फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले. पण त्याहून दुर्दैवी गोष्ट म्हणजे व्होट बँकेच्या राजकारणासाठी आता ते न्यायव्यवस्थेचाही दुरुपयोग करत आहेत. ही अशी परिस्थिती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह असू शकत नाही, असे पीएम मोदी यांनी म्हटले.
मुलाखतीत पुढे बोलताना पीएम मोदी म्हणाले, "ओडिशाचे भाग्य बदलणार आहे. तिथले सरकार बदलेल. सध्याच्या ओडिशा सरकारची मुदत ४ जून संपत आहे आणि ओडिशात १० जून रोजी भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल." असा दावाही मोदींनी केला आहे.
ओडिशा विधानसभा निवडणुकीवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "ओडिशाचा २५ वर्षांपासून विकास झालेला नाही." सगळ्यात मोठी चिंतेची गोष्ट म्हणजे अशा काही लोकांची टोळी आहे ज्यांनी ओडिशाची संपूर्ण व्यवस्था ताब्यात घेतली आहे. जर ओडिशा त्या बंधनातून बाहेर आला तरच ओडिशा उभारी घेईल."
ते पुढे म्हणाले, "…ओडिशात खूप नैसर्गिक संसाधने आहेत. इतक्या श्रीमंत राज्यात गरीब लोक पाहून दुःख होते. ओडिशा हे भारतातील समृद्ध राज्यांपैकी एक आहे. तेथे भरपूर नैसर्गिक संपत्ती आहे. पण ओडिशादेखील भारतातील सर्वात गरीब राज्यापैकी एक आहे. त्यामुळे ओडिशातील लोकांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत. यासाठी सरकार जबाबदार आहे. ओडिशाचे भाग्य बदलणार आहे. विद्यमान सरकारची एक्सपायरी डेट ४ जून आहे…"
जिथपर्यंत मोदींचा प्रश्न आहे, गेल्या २४ वर्षांपासून मी शिव्या (गालियां) खाऊन 'गाली प्रूफ' झालो आहे. 'मौत का सौदागर आणि 'गंदी नाली का कीडा', असे कोण म्हणाले होते? संसदेत आमच्या एका सहकाऱ्याने १०१ शिव्या मोजल्या होत्या. त्यामुळे निवडणुका असो वा नसो, हे लोक (विरोधक) शिव्या देणे हा त्यांचा हक्क आहे असे मानतात आणि ते इतके हतबल-निराश झाले आहेत की अपशब्द बोलणे हा त्यांचा स्वभाव बनला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
काश्मीरमधील विक्रमी मतदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "काश्मीरमध्ये जी परिस्थिती बदलली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम देशाच्या न्यायव्यवस्थेला प्रार्थना करू इच्छितो. सरकारकडे काम करण्याची रणनीती आहे. त्यासाठी कधी-कधी आम्हाला इंटरनेट बंद करावे लागले. काही एनजीओ न्यायालयात गेले आणि मी काही काळ इंटरनेट बंद केले तरीही तिथली मुले मोठ्या अभिमानानं सांगतात ५ वर्षापासून इंटरनेट बंद झालेले नाही. ५ वर्षापासून आम्हाला सरकारकडून सर्व सुविधा मिळत आहेत. काही दिवस अडचण झाली. पण ती एका चांगल्या कामासाठी होती. ज्या स्वयंसेवी संस्थांनी न्यायालयाच्या आधारे लढाई सुरू केली आहे, त्यांच्यापासून देशाला वाचवणे खूप महत्त्वाचे आहे."
'कोण तुरुंगात जाणार हे पंतप्रधान मोदी ठरवतात' या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आरोपावर पंतप्रधान मोदी म्हणाले, "या लोकांनी संविधान वाचले तर बरे होईल. देशाच्या कायद्याचा अभ्यास करावा. मला कोणालाही काहीही सांगायची गरज नाही."
हे ही वाचा :