ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण : सगळ्यांची नावे उघड करेन : डॉ. तावरेचा इशारा

ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण : सगळ्यांची नावे उघड करेन : डॉ. तावरेचा इशारा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगरमधील ड्रंक अ‍ॅन्ड ड्राइव्ह प्रकरणात ब्लड सॅम्पलमधील फेरफार प्रकरणात अटक केलेला ससूनमधील रुग्णालयातील न्याय वैद्यकशास्त्र विभागाचे (फॉरेन्सिक डिपार्टमेंट ) प्रमुख डॉ. अजय तावरे याने 'मी शांत बसणार नाही, मी सर्वांची नावे घेईन' असा इशारा दिला आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना तावरेने हे वक्तव्य केले आहे.त्यामुळे या प्रकरणी हात ओले केलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. डॉ. तावरे नेमकी कोणाची नावे घेणार आणि कोण या प्रकरणात अडकले जाणार? याबाबत सोमवारी (दि. 27) दिवसभर उलटसुलट चर्चा शहरात ऐकायला मिळाली.

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मुलाचे रक्तनमुने बदलल्याप्रकरणी डॉ. तावरेला गुन्हे शाखेने अटक केली आहे. सध्या त्याच्याकडे तपास करीत आहेत. अशातच आमदार सुनील टिंगरे यांनी तावरे याच्याबाबत हसन मुश्रीफ यांना दिलेले शिफारशीचे पत्र व्हायरल झाले आहे. त्यानंतर तावरे याने मी सर्वांची नावे घेणार, हे बोललेले वक्तव्य गंभीर आहे. त्यामुळे तावरे याला रक्ताचे नमुने बदलण्यासाठी कोणी दबाव आणला की आर्थिक प्रलोभन दाखविले, याबाबतचा भांडाफोड होण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे. तावरे अनेक वर्षांपासून ससून रुग्णालयात तळ ठोकून आहे. एक प्रकारे तो आर्थिक लूट करण्याचे रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्याच्या या कृत्यात अन्य कोण सहभागी आहे का? हे देखील आता पोलिसांना शोधावे लागणार आहे.

वादग्रस्त प्रकरणांत डॉ. तावरेने दोनदा गमावले अधीक्षकपद

कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणातील अल्पवयीन बिल्डरपुत्राच्या रक्ताच्या नमुना अहवालामध्ये फेरफार केल्याच्या आरोपावरून ससून सर्वोपचार रुग्णालयातील न्याय वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या किडनी रॅकेट प्रकरणापासून डॉ. तावरे बर्‍याच प्रकरणांमध्ये वादाच्या भोवऱ्यात आहेत. त्यांना यापूर्वी दोनदा अधीक्षक पदावरून हटवण्यात आले होते.

दोन वर्षांपूर्वी पुण्यातील बहुचर्चित किडनीतस्करी प्रकरणामध्ये डॉ. अजय तावरे दोषी आढळले होते. त्या वेळी ते ससून रुग्णालयाचे अधीक्षक आणि विभागीय अवयव प्रत्यारोपण मान्यता समितीचे अध्यक्ष होते. वैद्यकीय शिक्षण विभागाने डॉ. तावरे त्यांच्याकडून तब्बल आठ वर्षांपासून असलेला रुग्णालयाचा अधीक्षक पदाचाही पदभार तडकाफडकी काढून घेतला होता. तस्करी प्रकरणातील महिलेने आणि एजंटने बनवून दिलेले खोटी कागदपत्रे यांची सत्यता पडताळणी डॉ. तावरे यांनी न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. दीड वर्षापूर्वी न्याय वैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुखपदाची सूत्रे डॉ. नरेश झंजाड यांच्याकडे सोपवण्यात आली होती.

तेव्हाही डॉ. तावरे स्वस्थ बसले नाहीत. न्याय वैद्यक विभागाच्या अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्न केला होता. याबाबत ससूनच्या डीनकडे तक्रारही नोंदवण्यात आली होती. जानेवारी महिन्यात ससूनच्या आयसीयूमध्ये उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्या वेळी वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे चौकशी समिती नेमण्यात आली होती. अहवालातील शिफारसीनंतर 19 जानेवारी डॉ. तावरे यांचा अधीक्षकपदाचा कार्यभार काढून घेण्यात आला होता.

आ. टिंगरे यांनी केली होती डॉ. तावरेची शिफारस

डॉ. अजय तावरे यांना पुन्हा अधीक्षक पदाचा कार्यभार द्यावा, यासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना 26 डिसेंबर 2023 रोजी पत्र दिले होते. कोरोना काळात डॉ. तावरे यांनी अधीक्षक पदावरून उत्तम काम केल्याने त्यांना पुन्हा पदभार द्यावा, अशी शिफारस पत्रात केली होती. त्यानंतर मुश्रीफ यांनी त्या वेळी पदावर असलेले अधीक्षक कामाचे निकष पूर्ण करत नसून डॉ. तावरे यांना पुन्हा पदभार द्यावा, असा शेरा दिला होता.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news