रोडेवस्ती झाली प्रकाशमय; रहिवाशांकडून आनंदोत्सव साजरा | पुढारी

रोडेवस्ती झाली प्रकाशमय; रहिवाशांकडून आनंदोत्सव साजरा

कडूस : पुढारी वृत्तसेवा : जगाचा प्रवास चंद्रावर पोहोचला असताना खेड तालुक्यातील बिबी गावची 20 उंबर्‍यांची रोडेवस्ती अजूनही विजेअभावी अंधारात जगत होती. वस्तीतील रहिवाशांच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी एक युवक धावून आला. त्याच्या प्रयत्नामुळे वर्षानुवर्षे अंधारात असलेल्या वस्तीत प्रथमच वीज पोहोचली. वस्तीचा परिसर विजेच्या उजेडात उजळून निघाला अन् रहिवाशांनी दिवाळी सणाप्रमाणे आनंदोत्सव साजरा केला. जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे सदस्य रवींद्र गायकवाड असे या युवकाचे नाव आहे.

नुकतेच वस्तीला वीजपुरवठा करणार्‍या विद्युत रोहित्राचे लोकार्पण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच फसाबाई चतुर, उपसरपंच दीपक कालेकर, ग्रामपंचायत सदस्य अरुण गुंडाळ, सुरेश सैद, तंटामुक्त समितीचे पंढरीनाथ सैद, रोहित गुंडाळ, संभाजी रोडे, लक्ष्मण तनपुरे, चंद्रकांत भोर, कलाबाई तनपुरे, शुभम सैद, सागर भोर, यशोधा रोडे आदींसह ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.
चासकमान धरणामुळे विस्थापित झालेल्या रोडेवस्तीला 30 ते 32 वर्षांपासून ना रस्ता होता ना वीज. त्यात डोंगराच्या पायथ्याशी व पाण्याच्या कडेला असल्याने वन्य श्वापदांचा येथे नियमित वावर असतो.

त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. वीज नसल्याने अनेकदा लोक रात्रीच्या वेळी बाहेर पडण्यास धजावत नव्हते. तर विद्यार्थ्यांना कंदीलाखाली अभ्यास करावा लागत होता. मोबाईल चार्जिंगसाठी शेजारच्या गावात जावे लागत होते. याबाबतची माहिती मिळताच रवींद्र गायकवाड यांनी वस्तीवर जात पाहणी केली. त्यानंतर महावितरण स्थानिक प्रशासनाकडे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांनी सहकार्य केले आणि अखेर रोडेवस्तीवर वीजपुरवठ्यास मंजुरी मिळाली. त्यानुसार वीज यंत्रणा उभारून नुकतीच रोडेवस्तीवर वीज पोहोचली. रोडेवस्ती येथील विजेचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार दिलीप मोहिते पाटील व उपसरपंच दीपक कालेकर यांनी सहकार्य केल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button