धक्कादायक ! प्रेमात अडथळा ठरला; पतीसोबत तिने केले असे काही | पुढारी

धक्कादायक ! प्रेमात अडथळा ठरला; पतीसोबत तिने केले असे काही

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : चिंबळीतील (ता. खेड) बर्गेवस्ती हद्दीत घडलेल्या तरुणाच्या खुनाचा अखेर उलगडा झाला. खूनप्रकरणी तरुणाची पत्नी, तिचा प्रियकर, प्रियकराचा मित्र यांना गजाआड केल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने या गुन्ह्याची उकल केली. राहुल सुदाम गाडेकर (वय 36, रा. नर्‍हे, आंबेगाव, पुणे) याचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याची पत्नी सुप्रिया गाडेकर (वय 30), तिचा प्रियकर सुरेश मोटाभाऊ पाटोळे (रा. देहूगाव, पुणे), रोहिदास नामदेव सोनवणे (वय 32, रा. चिंचपूर, ता. संगमनेर) यांना अटक केली आहे. पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता चिंबळी बर्गेवस्ती ते कुरुळी रोडवर राहुल गाडेकर याचा खून झाला.

राहुल गाडेकर हे चाकण एमआयडीसीमधील फोक्सवॅगन कंपनीत रात्रपाळी ड्युटीसाठी दुचाकीवरून जात होते. त्या वेळी त्यांचा खून करण्यात आला. याबाबत आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा करीत होती.
पोलिसांनी राहुल काम करीत असलेली फोक्सवॅगन कंपनी आणि नर्‍हे आंबेगाव येथील घराजवळील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्याचबरोबर राहुल यांची पत्नी सुप्रिया हिच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यात तिच्यावर संशय बळावल्याने तिला ताब्यात घेण्यात आले. सुप्रिया ही नर्‍हे आंबेगाव येथील रुग्णालयात नर्स म्हणून काम करीत होती. कोरोना काळात तिने निमगाव पागा (ता. संगमनेर) येथे लॅब सुरू केली. त्यातून तिची ओळख पाटोळेशी झाली. पाटोळे हा सैन्यदलात नोकरी करीत होता.

ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. यावरून राहुल आणि सुप्रिया यांच्यात वाद होत होते. प्रेमात अडथळा ठरत असल्याने सुप्रिया आणि पाटोळे यांनी राहुलचा काटा काढण्याचे ठरविले. डिसेंबर 2023 मध्ये पाटोळे सुटीवर आला. त्याला राहुलचा खून करण्यासाठी एका साथीदाराची गरज होती. त्यामुळे त्याने चिंचपूर येथे जाऊन त्याचा मित्र सोनवणे याला सोबत घेतले. दोघांनी बाजारातून दोन लोखंडी हातोडे घेतले. त्यानंतर 23 फेब—ुवारी रोजी डोक्यात हातोडा घालून राहुलचा खून केला.

हेही वाचा

Back to top button