कुणी वीज देतं का वीज? संतप्त शेतकर्‍यांनी कैफियत | पुढारी

कुणी वीज देतं का वीज? संतप्त शेतकर्‍यांनी कैफियत

कोल्हार : पुढारी वृत्तसेवा : तिसगाव व तांबेवाडी परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. याविषयी अनेकदा तक्रारी करुनही दखल घेतली जात नसल्याने शेकडो शेतकर्‍यांनी कोल्हार खुर्दच्या महावितरण कार्यालयात जावून आपला संताप व्यक्त केला. गेल्या अनेक दिवसांपासून तिसगाव व तांबेवाडी फिडरवर दिवस व रात्री वीजपुरवठा पूर्ण दाबाने मिळत नसल्याने शेतकरी अनेक दिवसांपासून त्रस्त आहेत. महावितरण अधिकार्‍याकडे अनेकदा तक्रार करूनही दखल घेतलेली नाही. नेहमीच वीजपुरवठा सुरळीत करण्याचे व दुरुस्तीचे कारण दाखवून वीज पुरवठा तासनतास खंडित केला जातो.

त्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला, तर तो कमी दाबाने केला जात असल्यामुळे शेतकर्‍यांचा संयम संपण्याच्या मार्गावर आहे. याचाच एक भाग म्हणून संतप्त शेतकर्‍यांनी कोल्हारचे महावितरण कार्यालय गाठून याचा अधिकार्‍यांना जाब विचारला. कनिष्ठ अभियंता दिलीप गाढे यांना लेखी निवेदन देवून आपल्या व्यथाही मांडल्या. त्यावर गाढे यांनी निवेदन स्वीकारून शेतकर्‍यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. यावेळी अजित मोरे, पांडुरंग देवकर, रमेश निबे, राजेंद्र खर्डे, विठ्ठल देवकर, नंदू तरकसे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button