दुष्काळी गावांना कळमोडीचे पाणी मिळणार? काय म्हणाले दिलीप वळसे पाटील? | पुढारी

दुष्काळी गावांना कळमोडीचे पाणी मिळणार? काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?

मंचर : पुढारी वृत्तसेवा : खेड व आंबेगाव तालुक्यातील दुष्काळी गावांना वरदान ठरणार्‍या कळमोडी धरणाचे पाणी देण्यासाठी आमदार दिलीप मोहिते यांनीही सशर्त पाठिंबा दर्शविला आहे. त्यांच्या तालुक्यातील काही गावांना पाणी देण्यासाठी सहमती झाली आहे. भविष्यात कळमोडीचे पाणी शेतीला उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. कुरवंडी (ता. आंबेगाव) येथे विविध विकासकामांच्या उदघाट्न प्रसंगी ते बोलत होते. या वेळी विवेक वळसे पाटील, विष्णू हिंगे, नीलेश थोरात, सचिन पानसरे, सुभाष मोरमारे, अंकित जाधव, सरपंच मनीषा सुनील तोत्रे, उपसरपंच जितेंद्र जयसिंग तोत्रे, संतोष सैद, दत्तात्रेय तोत्रे, विकास बारवे, हरिदास मते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

सातगाव पठार भागातील गावात दिलीप वळसे पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मंत्री वळसे पाटील म्हणाले की, राज्यातील महायुतीचे सरकारमध्ये जनतेच्या हितासाठी धाडसी निर्णय घेण्याची क्षमता आहे. जुन्नर, आंबेगाव व खेड या तालुक्यांतील आदिवासी भागातील हिरडा उत्पादकांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला व पंधरा कोटी रुपयांचा मदत निधी मिळवला. हिरडा उत्पादक शेतकर्‍यांना मदत निधीचे वाटप देखील झाले. अतिवृष्टी ने बाधित शेतकर्‍यांना मदत मिळताना निधी असताना देखील काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्या दूर करण्यात आल्या आहेत.

मतांसाठी कधीही राजकारण केले नाही. सत्ताधारी पक्षातील असो अथवा विरोधातील असो, प्रत्येक गावाला समान न्याय देत विकास करण्याचे काम केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सातगाव पठार भागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा उमेदवार निवडून दिल्यास या भागातील विकासाला गती मिळेल. लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात विकासकामांना निधी दिला जाईल. सातगाव पठारावरील बंधार्‍यांमध्ये साचलेला गाळ काढण्यासाठी भीमाशंकर कारखान्याच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button