भंडारदरा, निळवंडे धरणांसह 12 जलसाठ्यांचे पोट खपाटीला ! | पुढारी

भंडारदरा, निळवंडे धरणांसह 12 जलसाठ्यांचे पोट खपाटीला !

राजेंद्र जाधव

अकोले : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान लाभलेल्या भंडारदरा, निळवंडे, आढळा धरणासह 12 लघु पाटबंधार्‍यांचे पोट खपाटीला गेले आहे. यंदाचा उन्हाळा आदिवासी भागासह शहरांनाही पाण्यासाठी व्याकुळ करण्याची वेळ येणार आहे. भंडारदर्‍यासह अकोले, संगमनेर, श्रीरामपूर परिसरातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. पावसाचे आगार समजल्या जाणार्‍या हरिश्चंद्रगड, कळसुबाई शिखर, भंडारदरा, निळवंडे, आढाळा धरण पाणलोट क्षेत्रात गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला नाही. यंदा मार्चच्या प्रारंभीच तालुका तापायला सुरुवात झाली आहे. यामुळे आत्तापासूनच आदिवासी परिसरासह शहरांमध्येही उन्हाचा कडाका जाणवत आहे.

चटका जाणवताना धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. उत्तर नगर जिल्ह्याचे जीवनदायीनी भंडारदरा धरणात आजमितीस केवळ 5329 दलघफू म्हणजेच 50 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 10, 586 दलघफू पाणीसाठा शिल्लक होता. निळवंडे धरणात 3827 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. गतवर्षी आजमितीस 4949 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक होता. आढळा धरणात 808 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी आजमितीस 927 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक होता.
दरम्यान, भंडारदरा व निळंवडे धरणांची खालावणारी पाणी पातळी उत्तर नगर जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

माळरान ओसाड झाले आहेत. विहिरींनी तळ गाठलाय तर कळंब, मन्हाळे, मुथाळणे, देवठाण, केळी व ओतूरच्या वाड्या, घोडेवाडी परिसरात दर वर्षीप्रमाणे पाणीटंचाई निर्माण होणार आहे. आदिवासी भागात बहुतांश गावांमध्ये विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकंती करण्याची वेळ आली आहे, मात्र जलजीवन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. 84 योजनांपैकी एकही काम अद्याप पूर्ण झाले नसल्याचे दिसते.

भंडारदरा व निळवंडेतील पाण्याचे नियोजन व्हावे

मार्च, एप्रिल, मे हे महिने तीव्र उन्हाचे असल्याने पाण्याची अधिक गरज असते; मात्र धरणातील कमी होऊ लागलेला जलसाठा धोक्याची घंटा निर्माण करणारा आहे. त्यातच काही दिवसांत लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे पाणी समस्येचा प्रश्न निवडणुकीत विरोधकांकडून ऐरणीवर राहणार आहे, हे नक्की.

  • खरीप हंगामातील क्षेत्र : निळवंडे धरण लाभक्षेत्रात 64.80 हेक्टर तर आढळा धरण लाभक्षेत्रात 418 हेक्टर
  • रब्बी हंगामातील क्षेत्र – भंडारदरा : 131.20 हेक्टर, निळवंडे : 195.50 हेक्टर, आढळा : 510 हेक्टर

असा आहे पाण्याचा साठा

शिळवंडी : 143.55 क्षमता 95.14 दशलक्ष घनफूट, सांगवी : 71.23 क्षमता 33.44 दशलक्ष घनफूट, पाडोसी :- 146 क्षमता 69.81 दशलक्ष घनफूट, अंबित : 193 क्षमता 95.26 दशलक्ष घनफूट, देवहंडी : 155 क्षमता 60.06 दशलक्ष घनफूट, बलठण : 202 क्षमता 109.42 दशलक्ष घनफूट, कोथळे : 182 क्षमता 102 दशलक्ष घनफूट, टिटवी : 303.32 क्षमता 232.43 दशलक्ष घनफूट, बोरी : 47.80 क्षमता 29.59 दशलक्ष घनफूट, बदगी बेलापूर : 94.98 क्षमता, 42.98 दशलक्ष घनफुट, वाकी :-112.66 क्षमता 79.95 दशलक्ष घनफूट, पिंपळगाव खांड : 600 क्षमता 194.16 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे, पण जायकवाडीला गेलेलं पाणी व निळवंड्याच्या उजव्या व डाव्या कालव्यांतून सोडलेल्या पाण्यामुळे लाभक्षेत्रात आनंद असला तरी आदिवासी भागासह नदीकाठच्या गावांना शेतीसह पिण्यासाठी पाण्याची समस्या भेडसावणार आहे.

निळंवडे धरणातून पाण्याचा वापर..!

दि. 22 26 सप्टेंबर 2023 दरम्यान 250 दशलक्ष घनफुट निळवंडे धरण पुर्ण संचय पाणी पातळीसाठी वापर, दि. 5 ते 13 नोव्हेंबर 2023 दरम्यान 702 दशलक्ष घनफुट पिण्याच्या पाणी वापर, दि.24 ते 29 नोव्हेंबर 2023 दरम्यान जायकवाडी आवर्तन 2, 108 दशलक्ष घनफूट पाणी वापर, दि. 7 ते 15 डिसेंबर 2023 दरम्यान 519 दशलक्ष घनफूट निळवंडे धरण भरण्यास पाणी वापर, दि.27 जानेवारी ते 16 फेब्रुवारी 2024 दरम्यान रब्बी हंगाम आवर्तन 1078 दशलक्ष घनफुट पाण्याचा वापर झाला.

हेही वाचा

Back to top button