भारत होणार उच्च मध्यमवर्गीय; मध्यमवर्गाची कात 2031 पर्यंत पडणार गळून | पुढारी

भारत होणार उच्च मध्यमवर्गीय; मध्यमवर्गाची कात 2031 पर्यंत पडणार गळून

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा :  अर्थगती स्थिर गतीने वाढत असून, एप्रिलपासून सुरू होणार्‍या आर्थिक वर्षातही 6.8 टक्के वाढीचा अंदाज आहे. अशाच पद्धतीने वाढीची गती कायम राहिल्यास भारत 2031 पर्यंत उच्च मध्यमवर्गात प्रवेश करेल, असा अंदाज क्रिसिलने वर्तविला आहे.

संबंधित बातम्या 

डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) 8.4 टक्के राहिले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेसह (आरबीआय) सर्वांचे अंदाज चुकवत जीडीपी वाढला आहे. तसेच, मार्च 2024 अखेर संपणार्‍या आर्थिक वर्षात 7.6 टक्के जीडीपी राहील, असा अंदाज आहे. येत्या 1 एप्रिलपासून सुरू होणार्‍या आर्थिक वर्षात (2024-25) जीडीपी 6.8 टक्के राहील, असा अंदाज क्रिसिल इंडिया आऊटलूक रिपोर्टमध्ये वर्तविला आहे. मूडीजने देखील पुढील आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 6.8 टक्के राहील, असा अंदाज नुकताच वर्तविला आहे.

येत्या सात आर्थिक वर्षात (2025-2031) भारतीय अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलरवरून सात लाख कोटी डॉलरच्या घरात जाईल. याशिवाय मध्यमवर्गाची कात टाकून देश उच्च मध्यमवर्गीय होईल. सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार 3.6 लाख कोटी डॉलर असून, जगातील पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे. अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी हे देश भारताच्या पुढे आहेत.

असे असेल उत्पन्न

जागतिक बँकेच्या व्याख्येनुसार निम्न मध्यमवर्गीय उत्पन्न गटातील नागरिकांचे सरासरी दरडोई वार्षिक उत्पन्न एक ते चार हजार रॉलर आहे. तर, उच्च मध्यमवर्गीय उत्पन्न गटातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न 4 ते 12 हजार डॉलरदरम्यान आहे. भारताचे दरडोई उत्पन्न 2031 पर्यंत 4,500 डॉलरवर जाईल, असा अंदाज आहे. म्हणजेच, जागतिक बँकेच्या व्याख्येनुसार निम्न मध्यमवर्गीय नागरिकांचे दरडोई उत्पन्न 83 हजार ते 3 लाख 31 हजार रुपयांदरम्यान आहे. तर, मध्यमवर्गीय नागरिकांचे दरडोई उत्पन्न 3.73 लाख रुपये आहे.

Back to top button