Nagar News : महापालिकेने सील केल्या 34 मालमत्ता | पुढारी

Nagar News : महापालिकेने सील केल्या 34 मालमत्ता

नगर : पुढारी वृत्तसेवा : महापलिकेच्या तिजोरीत नेहमीच खडखडाट असल्याने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी करवसुलीसाठी व्यापक मोहीम सुरू केली आहे. वीस दिवसांत पाणीपट्टी व मालमत्ताकर थकीत असणार्‍या सुमारे 250 जणांचे नळकनेक्शन तोडले, तर,सुमारे 34 मालमत्ता सील केल्या आहेत. येत्या काही दिवस ही मोहीम आणखी तीव्र करणार असल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले. महापालिकेची मालमत्ताकर आणि पाणीपट्टीचा थकीत कर 205 कोटींचा आहे. वारंवार आवाहन करूनही थकबाकीदार कर भरण्याकडे कानाडोळा करीत आहेत. त्यासाठी आता बड्या थकबाकीदारांची नावे चौकाचौकात जाहीररित्या फलकावर झळकावण्यात आली आहे.

करवसुलीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी प्रत्येक विभागाला उपायुक्तांची नेमणूक केली. दरम्यान, वसुलीत दिरंगाई होत असल्याने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी चार विभागांच्या उपायुक्तांना कर वसुलीबाबत कारणे दाखवा नोटिसा बजाविल्या. त्यामुळे आता करवसुलीला गती आहे. कर न भरणार्‍यांची मालमत्ता सील करणे व नळकनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत महापालिकेच्या वसुली विभागाने 250 थकबाकीदारांचे नळकनेक्शन तोडले आहेत. तर, सुमारे 34 जणांची मालमत्ता सील केली आहे.

एक मार्च रोजी एका दिवसांत दोन कोटी 4 लाख 3 हजार 131 रुपयांचा भरणा झाला. प्रभाग समिती दोनमध्ये कर न भरल्याने तीन मालमत्ताधारकांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले. तर, 95 हजारांची करवसुली करण्यात आली. दरम्यान, वसुली विभागाने आतापर्यंत थकीत करापोटी सुमारे 4871 मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटिसा बजाविल्या आहेत. सुमारे 197 मालमत्ताधारकांना वारंट बजावणी करण्यात आली आहे. जप्ती व नळकनेक्शन बंदची सुमारे 277 मालमत्ताधारकांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे.

  • प्रभाग एक 800885
  • प्रभाग दोन 273776
  • प्रभाग तीन 193398
  • प्रभाग चार 775072

हेही वाचा

Back to top button