Kolhapur Crime News : मटका, जुगार, तस्करीचे पेव, हप्तेखोरीमुळे गुन्हेगारांना चेव | पुढारी

Kolhapur Crime News : मटका, जुगार, तस्करीचे पेव, हप्तेखोरीमुळे गुन्हेगारांना चेव

कोल्हापूर; दिलीप भिसे : राजकीय आश्रय अन् हप्तेगिरीमुळे फोफावलेल्या अमली पदार्थ, बनावट दारू तस्करीसह मटका बुकी आणि तीन पानी जुगारी अड्ड्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याची वरिष्ठ अधिकार्‍यांची घोषणा केवळ वल्गनाच ठरत आहे. पुणे-बंगळूर महामार्ग, कोकणपट्ट्यासह सीमाभागात तस्करी टोळ्यांचे पेव फुटले आहे. 2022 ते 2023 या काळात जिल्ह्यात 8 हजार 166 जुगारी, तस्करांवर कारवाई करूनही कारनामे खुलेआम चालूच आहेत.

तीन पानी जुगारासह शहरातील मध्यवर्ती भरचौकात यंत्रणेच्या नाकावर टिच्चून मटक्याचे अड्डे सुरू आहेत. हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचे अड्डे रात्रंदिवस फुलू लागले आहेत. महामार्गावर बिनदिक्कत गुटखा, बनावट दारू तस्करीची रेलचेल आहे. या टोळ्यांना अभय देणार्‍या घटकांंवर कठोर कारवाईचा वरिष्ठांचा सज्जड इशारा असतानाही इचलकरंजी, हातकणंगले, शहापूरसह गोकुळ शिरगाव, शिरोळ, कुरूंदवाड,कागल, मुरगूड, चंदगड, नेसरी, राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी परिसरात काळेधंदेवाल्यांसह तस्करी टोळ्यांच्या हालचाली वाढू लागल्या आहेत. स्थानिक यंत्रणांना या कारनाम्यांचा मागमूस नाही, असेही नाही. मात्र वरिष्ठांच्या आदेशाला कोलदांडा देत स्थानिक पातळीवर तेरे भी चूप आणि मेरे भी चूप असा सारा मामला आहे.

गुंडांचा रात्र-दिवस वावर !

कागल तालुक्यातील अर्जुनीपैकी अर्जुननगर येथे स्किल गेमच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषणने पर्दाफाश करून 22 जणांना दोन दिवसापुर्वी जेरबंद केले. जिल्ह्यात बहुतांश पोलिस ठाण्याच्या हद्दीत करमणुकीच्या नावाखाली लुटण्याचे प्रकार सुरू आहेत. कर्नाटकासह सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील मोस्ट वॉटेड गुंडांची या अड्ड्यांवर वर्दळ असतानाही स्थानिक यंत्रणांकडून कहारवाई का होत नाही हा कळीचा मुद्दा आहे.

Back to top button