Lok Sabha Election 2024 : धर्म अथवा प्रार्थनास्थळांचा वापर केल्यास कठोर कारवाई; निवडणूक आयोगाकडून दिशानिर्देश जारी | पुढारी

Lok Sabha Election 2024 : धर्म अथवा प्रार्थनास्थळांचा वापर केल्यास कठोर कारवाई; निवडणूक आयोगाकडून दिशानिर्देश जारी

नवी दिल्ली : पीटीआय, लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या धर्म अथवा प्रार्थनास्थळावरून आवाहन करू नका, असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना केले आहेत. देव-देवता अथवा भाविकांचा अवमान होईल, अशा प्रकारची वक्तव्येही टाळली पाहिजेत, असे आयोगाने म्हटले आहे. (Lok Sabha Election 2024)

आगामी लोकसभा निवडणुकीची तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाकडून राजकीय पक्षांना दिशानिर्देश जारी केले आहेत. मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च आदी ठिकाणांचा अथवा प्रार्थनास्थळांचा प्रचारासाठी वापर केल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करणार असल्याचा इशाराही आयोगाने दिला आहे. याआधी संबंधितांना नैतिक समज दिली जात होती. या खेपेस आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, अशा शब्दांत आयोगाने निर्देश दिले आहेत. या महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनीही निवडणुकीतील गैरप्रकार खपवून घेणार नसल्याचे सांगितले आहे. प्रचारातून दुहीची बीजे पेरण्याऐवजी नैतिकदृष्ट्या आदर्श प्रचार करायला हवा, असेही त्यांनी याआधी स्पष्ट केले आहे.

निवडणूक काळात एआय कंपन्यांसाठी नियमावली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने गुगल आणि ओपन एआयसारख्या एआय कंपन्यांसाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शिका जारी केली आहे. निवडणुकीच्या काळात देशातील एकसंधतेला धोका पोहोचेल, असा मजकूर अथवा चित्रफिती एआय कंपन्यांनी निर्माण करू नयेत, असे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले. एआय संबंधित कंपन्यांना नव्या नियमावलीमुळे केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे.

Lok Sabha Election 2024 : केंद्राकडून नोटीस;

डीपफेकसारखे प्रकार घडल्यास कठोर कारवाई एआय कंपन्यांना विश्वासार्हतेसाठी केंद्राची परवानगी आवश्यक असल्याचेही चंद्रशेखर यांनी म्हटले आहे. डीपफेकचा धोका असल्याने सर्व एआय कंपन्यांना केंद्र सरकारला डेमो दाखवावा लागणार आहे. गैरप्रकार अथवा केंद्राच्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा 

Back to top button