

वाई बाजार; पुढारी वृत्तसेवा : माहूर तालुक्यातील अंजनखेड येथून बारावीचा पेपर देवून घराकडे जात असलेल्या दहेली येथील विद्यार्थ्यांच्या दुचाकीला दहेलीनजीक भीषण अपघात झाला. या अपघातात दोन विद्यार्थी ठार तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
किनवट तालुक्यातील मौजे दहेली येथील प्रतिक लेंडे, कृष्णा बोंतावार व गणेश तोटावार हे बारावीचे विद्यार्थी मौजे दहेली तांडा येथील महाविद्यालयातील आहे. दरम्यान आज (दि. २ मार्च) रोसकाळी ११ ते २ या कालावधीतील बारावी बोर्डाचा पेपर देवून ते आपल्या गावाकडे निघाले असता दहेली गावा नाजीकच्या एका वळणावर त्यांचे दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडावर आदळली. यामध्ये प्रतिक लेंडे, कृष्णा बोंतावार, गणेश तोटावार हे तिघेही गंभीर जखमी झाले. त्यावेळी दहेलीचे सरपंच राकेश तोटावर यांनी खासगी वाहनाद्वारे जखमींना दहेली तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र गंभीर जखमी असल्याने प्राथमिक उपचारानंतर यवतमाळ येथे हलवण्यात आले. यवतमाळ रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रतिक लेंडे व कृष्णा बोंतावार या विद्यार्थ्यांना मृत घोषित केले. तर गणेश तोटावर हा विद्यार्थी जखमी असल्याची माहिती दिली. त्यामुळे संपुर्ण दहेली गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.