Dabholkar murder case : डॉ. दाभोलकरांची हत्या करून मृतदेह शिंदे पुलावर टाकला | पुढारी

Dabholkar murder case : डॉ. दाभोलकरांची हत्या करून मृतदेह शिंदे पुलावर टाकला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शनिवार पेठ येथील घरातून मॉर्निंग वॉकसाठी जाताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना कोणीही पाहिले नाही. त्यामुळे त्यांची हत्या करून मृतदेह महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर टाकल्याच्या दाव्याला पुष्टी मिळते, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील प्रकाश साळशिंगीकर यांनी न्यायालयात केला. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुरू आहे. त्यामध्ये बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. साळशिंगीकर यांनी अंतिम युक्तिवाद शुक्रवारी केला.

बचाव पक्षाच्या वतीने युक्तिवाद करताना अ‍ॅड. साळशिंगीकर म्हणाले, समितीच्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी, डॉ. दाभोलकरांनी बोगस डॉक्टर व जातपंचायती, भोंदूबाबा व खडेवाले यांच्याविरोधात छेडलेली मोहीम, डॉ. दाभोलकरांचे शेवटचे कॉल डिटेल्स, विदेशी सिमकार्ड या शक्यतांचा तपासही सीबीआयने केला नाही. तसेच, डॉ. दाभोलकरांविषयी आरोपींमध्ये शत्रुत्वाची भावना, गुन्ह्याचा हेतू, शवविच्छेदनाच्या नोंदी, पुणे पोलिस व सीबीआयने केलेला तपास अशा विविध मुद्द्यांवर सरकार पक्षाचे दावे खोडून काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

अंनिसच्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी व वाद, बोगस डॉक्टर आणि जातपंचायतींच्या विरोधात दाभोलकरांनी सुरू केलेली मोहीम अन्य हिंदुत्ववादी संघटनांसोबतचे वाद या गोष्टी सीबीआयच्या तपास अधिकार्‍यांनी गुन्ह्याच्या तपासादरम्यान विचारात घेतलेल्या नाहीत.
पुणे पोलिसांनी केलेले पंचनामे नीट वाचले नाहीत, विविध जबाबांची दखल घेतलेली नाही. तपास अधिकारी राष्ट्रपती
पुरस्कार विजेते आहेत. परंतु ते दाभोलकरांचे घर असलेल्या इमारतीतही गेले नाहीत. दाभोलकरांची सदनिका व हत्येच्या घटनास्थळावर सनातन संस्थेशी संबंधित कोणतीही गोष्ट मिळालेली नाही. दरम्यान, या प्रकरणात आज (दि. 2) बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. विरेंद्र इचलकरंजीकर अंतिम युक्तिवाद करणार आहेत.

मृत्यू कधी झाला हे रहस्यच…

डॉ. दाभोलकरांचे शवविच्छेदन योग्यप्रकारे केले गेले नाही. त्यांच्या शरीरात विष होते की नाही, त्यांचा मृत्यू कधी झाला, हे डॉक्टर सिद्ध करू शकले नाहीत. पोटातील नमुने तसेच व्हिसेरा काढून घेतलेला नाही. सीबीआयच्या साक्षीदारांच्या साक्षीतून गुन्ह्याचा हेतू सिद्ध झालेला नाही, अशा विविध मुद्द्यांकडे बचाव पक्षाने न्यायालयाचे लक्ष वेधले.

हेही वाचा

Back to top button