Pakistan | २६/११ मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधार आझम चीमा याचा पाकिस्तानात मृत्यू | पुढारी

Pakistan | २६/११ मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधार आझम चीमा याचा पाकिस्तानात मृत्यू

पुढारी ऑनलाईन : २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधार आझम चीमा (वय ७०) याचा पाकिस्तानात (Pakistan) मृत्यू झाला आहे. लश्कर-ए-तैयबाचा (LeT) गुप्तचर प्रमुख आझम चीमा याचे फैसलाबाद येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. अलीकडच्या काही महिन्यांत लश्कर-ए-तैयबाच्या अनेक दहशतवाद्यांच्या गूढ हत्या झाल्या आहेत. पाकिस्तानने अनेक एलईटी कार्यकर्त्यांच्या हत्येमागे भारतीय एजन्सीचा हात असल्याचा आरोप केला आहे. पण हे आरोप भारताने फेटाळले आहेत.

चीमा हा २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा आणि जुलै २००६ च्या मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटांसह भारतातील इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार होता. २००८ चा हल्ला घडवून आणलेल्या दहशतवाद्यांना कथितपणे प्रशिक्षण दिल्याबद्दल अमेरिकन सरकारच्या वॉटेंड यादीत त्याचे नाव होते. या हल्ल्यात ६ अमेरिकन नागरिकांसह एकूण १६६ लोकांचा मृत्यू झाला होता.

२६/११ मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार

२६ नोव्हेंबर २००८ रोजी १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सागरी मार्गाने दक्षिण मुंबई भागात प्रवेश केला होता आणि ताजमहाल पॅलेस हॉटेलसह अनेक ठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यात १६६ लोकांचा मृत्यू झाला होता.

गुप्तचर सूत्रांनी चीमाचे वर्णन पंजाबी बोलणारा, दाढीवाला आणि एलईटी ऑपरेटिव्ह म्हणून केले होते. २००० च्या सुरुवातीला तो पाकिस्तानातील बहावलपूर येथे त्याची पत्नी आणि दोन मुलांसह राहिला होता. “तो अनेकदा सहा अंगरक्षकांसह लँड क्रूझरमधून फिरताना दिसला होता. चीमा यानेच एकेकाळी आयएसआयचे माजी प्रमुख जनरल हमीद गुल, ब्रिगेडियर रियाझ आणि कर्नल रफिक यांना बहावलपूर कॅम्पमध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेत असलेल्या जेहादींचे ब्रेनवॉश करण्यासाठी आणले होते. तो अधूनमधून कराची तसेच लाहोर प्रशिक्षण शिबिरेला भेटी देत असे.” असे एका सूत्राने सांगितले.

चीमा २००८ मध्ये पाकिस्तानातील (Pakistan) बहावलपूरचा एलईटी कमांडर म्हणून काम करत होता. तेव्हा त्याला लष्करचा वरिष्ठ पदाधिकारी झकी-उर-रहमान लखवी याचा ऑपरेशन सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. २६/११ च्या मुंबई हल्ल्यासाठीच्या भरती प्रशिक्षणाव्यतिरिक्त नियोजन आणि हल्ला घडवून आणण्यात त्याचा सहभाग होता.

हे ही वाचा :

Back to top button