हर्षवर्धन पाटील यांचे ग्रहण सुटेना : 1995 पासूनचा राजकीय संघर्ष पाठ सोडेना | पुढारी

हर्षवर्धन पाटील यांचे ग्रहण सुटेना : 1995 पासूनचा राजकीय संघर्ष पाठ सोडेना

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभेच्या जागेवरून 1991 पासून सुरू झालेले इंदापूर व बारामती तालुक्याचे राजकीय वैर मिटता मिटेना झाले आहे. आघाडी, युती, महायुती यातून राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथ होऊन राजकीय गणिते जुळवली गेली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मात्र यातून सुटका होईना. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील पवार-पाटील संघर्षाचे कोडे काही सुटेनासे झाले आहे. 2019 मध्ये या सर्वाला कंटाळून हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला, इथून पुढे तरी आपण राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात जाहीरपणे निवडणूक लढू, छुप्या वारापासून सावध राहू, अशी अटकळ कार्यकर्त्यांनी बांधली होती. मात्र, अजित पवार हेच भाजपच्या महायुतीत सामील झाल्याने पुन्हा हर्षवर्धन पाटील यांची कोंडी झाली आहे.

2004 ते 2019 या चार लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्माचे पालन करीत हर्षवर्धन पाटील यांनी पवारांना सहकार्य केले. लोकसभेला प्रामाणिक काम करूनही त्यांना विधानसभेला विरोधच होत राहिला. आता पुन्हा मागचे दिवस आठवू लागले आहेत. लोकसभेला युती, आघाडी, महायुती धर्माचे पालन करायचे आणि विधानसभेला त्यांच्याच विरोधात दंड थोपटायचे, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. विधानसभेला काय, याचे गणित आत्तातरी कोणीच मांडू शकत नाही. हर्षवर्धन पाटील यांच्या नशिबी पुन्हा शब्द फिरविण्याचे राजकारणच येईल की काय? अशी शक्यता वर्तविली जात आहे. लोकसभेला आता हर्षवर्धन पाटील यांना महायुतीचा उमेदवार म्हणून अजित पवार जो उमेदवार देतील, त्याचेच काम करावे लागणार आहे व विधानसभेला पुन्हा त्यांच्याच छुप्या वारांना सामोरे जावे लागणार आहे, असेच राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

मोठ्या भाऊंपासून डावलण्याचा इतिहास

1991 साली तत्कालीन खासदार शंकरराव (मोठे भाऊ) पाटील यांची उमेदवारी डावलून शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासाठी बारामतीची लोकसभेची उमेदवारी खेचून आणली, तेव्हापासून इंदापूरमध्ये खर्‍या अर्थाने पाटील-पवार संघर्ष सुरू झाला. 1995 साली काँग्रेसमधून हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून नाव पुढे आले. हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली व विजय मिळवला.

पुढे 1999 सालच्या विधानसभा निवडणुकीत देखील हर्षवर्धन पाटील यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली. त्यानंतर पाटील यांनी विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तेव्हा देखील पवारांकडून त्यांना कडाडून विरोध झाला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन होऊनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी पदभार स्वीकारला नाही व शेवटी हर्षवर्धन पाटील यांना राजीनामा देण्यास पवारांनी विशेषत: अजित पवार यांनी भाग पाडले.

कोणत्या पवारांना करायची मदत…

या वेळच्या लोकसभा निवडणुकीची स्थिती मोठी गमतीशीर आहे. मागच्या तीन लोकसभेला शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी अजित पवार आणि शरद पवार यांनी पाटील यांची मदत घेतली होती, तर या वेळी शरद पवार यांना कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी, तर अजित पवार यांना पत्नी सुनेत्रा यांच्यासाठी पाटील यांची मदत हवी आहे. या वेळी पवारांमध्येच फूट पडली असली, तरी आता पाटील यांच्यासमोर पाठिंब्याचे मोठे कोडे पडले आहे.

हेही वाचा

Back to top button