बेळगाव : मोदगे भावेश्वरी यात्रा रविवारपासून | पुढारी

बेळगाव : मोदगे भावेश्वरी यात्रा रविवारपासून

दड्डी; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र, कर्नाटक व अन्य राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मोदगे (ता. हुक्केरी) येथील भावेश्वरी देवीच्या यात्रेला रविवार (दि. २५) पासून सुरुवात होत आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोदगे या प्रमुख गावासह सलामवाडी, शट्टीहळी, खवणेवाडी, दड्डी- रामेवाडी या गावात मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. मोदगे येथील भावकाई देवी पाटील ट्रस्ट कमिटी, ग्रामपंचायत, मुंबई येथील पाटील मित्र मंडळ व ग्रामस्थ यांच्या वतीने यात्रेची जय्यत तयारी केली आहे.

भावेश्वरी यात्रा रविवार (दि. २५) ते मंगळवार (दि. २७) असे तीन दिवस असली तरी या त्यानंतर आठ दिवस सुमारे दीड लाख भाविक दर्शनासाठी मोदगे येथे उपस्थिती दर्शवतात. त्यामुळे प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. कडक बंदोबस्त ठेवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नियोजन केले आहे. रविवारी शस्त्रइंगळ्या कार्यक्रम होणार असून सायंकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी ६ पर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. यानंतर सोमवारी (दि. २६) भरयात्रा होईल. मंगळवारी (दि. २७) रोजी पालखी सोहळा व यात्रा समाप्ती होईल.

मुख्य भावेश्वरी मंदिराची संपूर्ण रंगरंगोटी करण्यात आली असून मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गावातील नागनाथ मंदिर, ब्रह्मदेव मंदिर, बसवाना मंदिर, मारुती मंदिर, गुरुदेव मंदिर या मंदिरांचा भावकाई देवी पाटील ट्रस्ट कमिटीने जिर्णोद्धार केला आहे. यात्रेला येणारे भाविक या मंदिरांनाही भेट देऊन दर्शन घेतात.

सदर यात्रा प्रामुख्याने मोदगे, सलामवाडी, शेट्टीहळी, खवणेवाडी, दड्डी – रामेवाडी अशी पाच गावांची असली तरी बेळगाव, हुक्केरी, चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यासह अन्य ठिकाणाहून सुमारे दीड लाख भाविक येतात. येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. भावकाईदेवी पाटील ट्रस्ट कमिटी, ग्रामपंचायत प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे.

भावकाई देवी पाटील ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष भाऊराव पाटील, सेक्रेटरी संतराम पाटील तसेच विश्वस्त चंद्रकांत पाटील, सुधाकर पाटील, भागोजी पाटील, अशोक पाटील, नंदकुमार पाटील, मारुती पाटील, आप्पा पाटील यांच्यासह ग्रामपंचायत अध्यक्ष स्मिता कोकीतकर, उपाध्यक्ष दयानंद शिंदे, पीडीओ संतोष खदगोळ आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. गावातील संपूर्ण स्वच्छतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. गावात तसेच यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी दोन नवीन पाण्याच्या टाक्याही उभारण्यात आल्या आहेत. देवस्थान ट्रस्ट कमिटीतर्फे यंदा नव्याने गावच्या प्रवेशद्वारात स्वागत कमान उभारली जात आहे. या कमानीवर लक्ष्मीदेवीची मूर्ती तसेच दोन्ही बाजूला कमानीवर दोन हत्तींच्या मूर्ती साकारण्यात आल्या आहेत.

यल्लमा देवस्थानच्या धर्तीवर लाडूचा प्रसाद

भावकाई देवी पाटील ट्रस्ट कमिटीकडून भाविकांना यंदा पहिल्यांदाच प्रसाद म्हणून लाडू उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यल्लमा देवीच्या धर्तीवर या मंदिरातही यंदापासूनच अशाप्रकारे प्रसाद देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबतची तयारी पूर्ण झाली आहे.

बकरी-कोंबडी विक्री बाजाराचे ठिकाण यंदा बदलले

यंदा पहिल्यांदाच बकरी आणि कोंबडी विक्री बाजाराचे ठिकाण बदलण्यात आले आहे. पूर्वी खवणेवाडी रोड या ठिकाणी बाजार भरत होता. मात्र यंदा तो बदलून हा बाजार सलामवाडी रोड, गौळदेव मंदिर येथील मोदगे गावच्या गायरानात नियोजित केला आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत व यात्रा कमिटीतर्फे मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच वीज दिव्यांची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व महाराष्ट्र – कर्नाटकातील भाविकांनी या बदललेल्या ठिकाणाची नोंद घ्यावी, असे आवाहन यात्रा कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

गावातील सर्व ग्रामस्थांच्या एकोप्याने भावेश्वरी देवीच्या यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. यात्रेदरम्यान सुमारे दीड लाख भाविक दर्शनासाठी उपस्थित राहतील. यामुळे नेटके नियोजन केले आहे. ट्रस्ट कमिटी, ग्रामस्थ, तालुका प्रशासन, ग्रामपंचायत यांचे चांगले सहकार्य मिळत असून यात्रा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
– भाऊराव पाटील, अध्यक्ष, भावकाई देवी पाटील ट्रस्ट कमिटी, मोदगे

हेही वाचा : 

Back to top button