शिवरायांचे पहिले शिल्प बेळगाव-धारवाड सीमेवर | पुढारी

शिवरायांचे पहिले शिल्प बेळगाव-धारवाड सीमेवर

जितेंद्र शिंदे

यादवाड (जि. धारवाड) : छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले आणि खरे छायाचित्र कोणते, यावर अजूनही वाद रंगत असले तरी शिवरायांचे पहिले शिल्प बेळगाव-धारवाड सीमेवर आहे. धारवाडपासून दहा किलोमीटरवर असलेल्या यादवाड गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे हे शिल्प आहे असून बेळवडी संस्थानची राणी मल्लम्मा यांनी छत्रपती शिवरायांच्या हयातीतच हे शिल्प बनवून घेतले, असे सांगितले जाते.

1674 मध्ये रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर शिवरायांनी स्वराज्याची सीमा वाढवण्यासाठी दक्षिणेवर स्वारी केली. थेट तंजावरपर्यंत धडक मारून भगवा झेंडा दक्षिणेत फडकावला. हा दक्षिण दिग्विजय मिळवून शिवराय मराठी मुलखाकडे (आजचा महाराष्ट्र) निघाले होते.

धारवाडजवळ आल्यानंतर बैलहोंगल तालुक्यातील पंधरा-वीस गावांच्या बेळवडी संस्थानसोबत मराठा सैनिकांची लढाई झाली. या लढाईत बेळवडी संस्थानचा प्रमुख ईशप्रभू देसाई यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांची पत्नी राणी मल्लम्मा यांनी मराठी सैन्याविरोधात लढा दिला. तिला मराठा सैनिकांनी पकडून शिवरायांसमोर नेले. महिलेला समोर पाहून शिवराय चमकले. त्यानंतर त्यांना कळले की, संस्थानिक ईशप्रभू देसाई यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शिवरायांनी खेद व्यक्त करत मल्लम्मा यांना बहीण मानून संस्थान परत केले. शिवरायांच्या या कृतीमुळे भारावून गेलेल्या मल्लम्मा यांनी महाराजांचे शिल्प कोरून घेतले.

काय आहे या शिल्पात?

यादवाड येथे मल्लम्मा यांनी शिवरायांचे युद्धनायक हे शिल्प साकारले आहे. अशी शिल्पे राणीने इतर ठिकाणीही पाठवली होती. यादवाडमधील शिल्पात छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर स्वार होऊन आपल्या सैनिकांसह कूच करताना दिसतात. त्यांच्या एका हातात तलवार व दुसर्‍या हातातही शस्त्र आहे. त्यांच्यासोबत एक श्वानही चालले आहे. शिल्पाच्या खालच्या भागात शिवराय हातात एक वाटी धरून मल्लमाच्या मुलाला दूध पाजत आहेत. तो शिवरायांच्या मांडीवर बसलेला दिसतो. मल्लमाही जवळच उभी असलेली दिसते.

तीन किलोमीटरवर तोफ

यादवाडपासून तीन किलोमीटरवर लगमापूर गाव आहे. तिथे शिवकालीन तोफ आहे. छत्रपती शिवाजी महाराज धारवाडहून बैलहोंगलकडे जात असताना ती तोफ तेथेच सोडून गेले असावेत, असा अंदाज आहे.

Back to top button