Russia-Ukraine War : युक्रेन युद्धाची दोन वर्षे | पुढारी

Russia-Ukraine War : युक्रेन युद्धाची दोन वर्षे

साम्यवादी सोव्हिएत युनियनला जगातील एक प्रबळ सत्ता बनवणारा आणि जागतिक राजकारणात बड्या राष्ट्राचे स्थान देशाला मिळवून देणारा नेता म्हणून जोझेफ स्टॅलिन यांची इतिहासात नोंद आहे. व्यापक प्रमाणावर सामुदायिक शेतीचा कार्यक्रम अमलात आणून आणि पंचवार्षिक योजनांद्वारे गतिमान उद्योग विकास साध्य करून, त्यांनी रशियाला समर्थ बनवले. (Russia-Ukraine War)

या विकासामुळेच ते दुसर्‍या महायुद्धात हिटलरचा पराभव करू शकले. एवढेच नव्हे, तर त्यांनी पूर्व जर्मनीपासून उत्तर कोरियापर्यंतचा सलग भूप्रदेश कम्युनिस्ट प्रभावाखाली आणला. स्टॅलिन यांच्या मृत्यूनंतर निकिता क्रुश्चेव्ह यांच्याकडे सत्ता आली आणि रशियाचा पोलादी पडदा किंचित किलकिला झाला. स्टॅलिन यांच्या अमानुष कृत्यापासून क्रुश्चेव्ह यांनी पूर्ण फारकत घेतली; पण त्याचवेळी हंगेरीतील उठाव दडपण्याचा प्रयत्न केला आणि क्युबात क्षेपणास्त्र पाठवण्याच्या त्यांच्या निर्णयाने जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले होते. नव्या सहस्रकात जागतिकीकरण, उदारीकरण आणि इंटरनेट क्रांतीमुळे शांतता आणि सौख्य नांदेल, अशी आशा निर्माण झाली होती; परंतु ती पूर्णतः फोल ठरली. (Russia-Ukraine War)

अफगाणिस्तान, इराक, सीरिया आणि इस्रायल येथे संघर्षाच्या ठिणग्या पडून त्यांचे युद्धांमध्ये परिवर्तन झाले. स्टॅलिनप्रमाणेच पुतीनही विस्तारवादी असून, रशियाला महान बनवण्याच्या आकांक्षेपोटी सीरिया, येमेन, सौदी अरेबिया अशा ठिकठिकाणी ते दादागिरी करत आहेत. दोन वर्षांपूर्वी 24 फेब्रुवारी, 2022 रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. अजूनही हे युद्ध सुरूच असून, त्यामध्ये रशिया आणि युक्रेनच्या सैनिकांचे तसेच निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनमधील हजारो इमारती, कार्यालये, घरे, कारखाने, वीज केंद्रे उद्ध्वस्त झाली आहेत. ‘उभय देशांमधील प्रश्न शांततेने सोडवावा, जगाला आज युद्धाची गरज नाही,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते; परंतु पुतीन हे युद्धखोरीच्या ज्वराने पछाडलेले आहेत. (Russia-Ukraine War)

युक्रेनला ‘नाटो’मध्ये सामील व्हायचे आहे; परंतु युक्रेन ‘नाटो’त सामील झाल्यास, या देशांचे सैन्य व तळ आपल्या सीमेजवळ येतील आणि सुरक्षेला धोका निर्माण होईल, अशी रशियाची अनाठायी भीती आहे. मात्र, युक्रेन हा सार्वभौम देश नसून, पाश्चात्त्य देशांची कठपुतळी बनला आहे, असे रशियाचे मत आहे. ‘नाटो’चे सदस्यत्व स्वीकारणार नाही, निःशस्त्रीकरण करू व तटस्थ राष्ट्र म्हणून काम करू, असे जाहीर करण्याचे आवाहन रशियाने युक्रेनला केले. वास्तविक युक्रेनने एखाद्या संघटनेत सामील व्हायचे की नाही, हा त्याचा प्रश्न आहे. शिवाय रशियाला कोणताही धोका निर्माण केला जाणार नाही, अशी ग्वाही ‘नाटो’ने देऊनही रशियाचे समाधान झाले नाही. खरे तर युक्रेनचे रशियाशी पूर्वीपासून सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. युक्रेनमध्ये रशियन भाषा मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

सन 2014 मध्ये युक्रेनमध्ये जे राष्ट्राध्यक्ष होते, तेच रशियाची कठपुतळी बनले होते. त्यांची हकालपट्टी झाल्यावर पुतीन यांचे पित्त खवळले. दोन वर्षांपूर्वी, म्हणजे 24 फेब्रुवारी, 2024 रोजी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनवर आक्रमण केले. आता गेल्या आठवड्यात रशियन फौजांनी युक्रेनमधील अव्हडिव्का या शहरावर ताबा मिळवला असून, 2023 च्या मेमध्ये बखमतवरही रशियाने कब्जा मिळवला होता. रशियन सैनिकांना थोपवण्यासाठी अमेरिकेसह अन्य मित्रदेशांनी लवकरात लवकर पाठबळ पुरवावे, असे आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केले आहे. यापूर्वी रशियाने युक्रेनचा खारकीव्ह विभागही पादाक्रांत केला होता; परंतु आता या विभागाच्या आग्नेय भागात युक्रेनने पुन्हा वर्चस्व स्थापन करण्यास सुरुवात केली आहे.

रशियाची अनेक जहाजे उद्ध्वस्त केली आहेत, असा दावा झेलेन्स्की यांनी केला आहे. मार्चमध्ये अमेरिकन संसदेत युक्रेनला मदत करण्याचा निर्णय होणार आहे; परंतु ही मदत लवकरात लवकर मिळाली नाही, तर फार अडचण होणार आहे, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. परंतु, अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार असून, अध्यक्ष जो बायडेन हे त्यामध्ये अधिक गुंतलेले आहेत. सन 2014 मध्ये रशियाने आधी युक्रेनचा अविभाज्य भाग असलेल्या क्रिमियावर बेकायदेशीरपणे ताबा मिळवला. रशियन फौजा तेथे घुसवल्या जाण्यापूर्वीच रशियाचा पाठिंबा असलेल्या फुटीरतावाद्यांनी युक्रेनच्या पूर्वेला असलेल्या दोनबास प्रांतातील भूमीवर ताबा मिळवला होता. स्वयंघोषित दोनेत्सक पीपल्स रिपब्लिक आणि लुहान्स्क पीपल्स रिपब्लिक या दोन स्वयंघोषित प्रांतांच्या स्वतंत्रतेला आम्ही मान्यता देत आहोत, अशी घोषणा 21 फेब्रुवारी, 2022 रोजी पुतीन यांनी केली होती. त्यानंतर तीन दिवसांतच दोनबास प्रांतात विशेष लष्करी मोहीम सुरू करत असल्याचे पुतीन यांनी जाहीर केले आणि संयुक्त राष्ट्रांच्या आवाहनास केराची टोपली दाखवत, आपल्या फौजा तेथे घुसवल्या.

या फौजा राजधानी कीव्हच्या दिशेने पुढे सरकवण्यात अपयश आल्याने, सुरुवातीला रशियाच्या सैन्याने आपला मोर्चा पूर्वेला असलेल्या लुहान्स्क आणि दोनेत्स्कच्या जवळच्या भागांना क्रिमियाशी जोडण्याकडे वळवला. रशियाने युक्रेनच्या शहरांवर आणि वीज केंद्रांवर क्रूज मिसाईल आणि ड्रोनद्वारे शेकडो हल्ले केले; मात्र रशियन सैन्य आणि वॅग्नर ग्रुप या एका खासगी संघटनेने सोलेदार शहरावर ताबा मिळवण्याचे श्रेय कोणाचे, यावरून सार्वजनिकरीत्या परस्परविरोधी वक्तव्येही केली होती. मागच्या 24 जानेवारीला युक्रेनने त्यांचे स्वतःचे युद्धकैदी वाहून नेणारे विमान पाडल्याचा आरोप रशियाने केला होता, तर हा आपल्याला बदनाम करण्याचा कट असल्याचे युक्रेनने म्हटले होते. पुतीन यांच्यासारख्या नेत्यांमुळे जग अशांततेच्या घेर्‍यात सापडले असून, त्याची मोठी आर्थिक किंमत सर्व देशांना चुकवावी लागत आहे. (Russia-Ukraine War)

हेही वाचा :

Back to top button