52 सेकंद रोज थांबते भारतातील ते शहर!.. | पुढारी

52 सेकंद रोज थांबते भारतातील ते शहर!..

नलगोंडा : भारतात अशी अनेक शहरे आहेत, ज्यांना वेगवेगळ्या गुणवैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते. या शहरांची स्वत:ची अशी काही तरी खासियत असते. तामिळनाडूतील एक शहर मात्र अगदीच हट के असून, येथे रोज हे शहर तब्बल 52 सेकंदांसाठी पूर्णपणे थांबते आणि हा सन्मान असतो राष्ट्रगीतासाठी!

एरवी, प्रजासत्ताकदिनी, स्वातंत्र्यदिनी राष्ट्रगीत गात असताना ज्या-त्या ठिकाणी सर्वजण स्तब्ध राहून मानवंदना देतात. तामिळनाडूतील नलगोंडा येथे मात्र वर्षभर रोज नित्यनेत्याने असा सन्मान दिसून येतो.

या शहरात दररोज सकाळी 8 वाजता लाऊडस्पीकरवर राष्ट्रगीत वाजवले जाते. राष्ट्रगीत सुरू होताच शहरातील प्रत्येक व्यक्ती, कुठेही असले तरी, आहे त्या ठिकाणीच 52 सेकंद थांबते. रस्त्यावरील गाड्या थांबतात, माणसे स्तब्ध उभी राहतात. संपूर्ण शहर 52 सेकंदांसाठी स्तब्ध होते. ही परंपरा गेल्या 2 वर्षांपासून सुरू आहे.

प्रारंभी, जम्मीकुंट नावाच्या ठिकाणाहून दररोज राष्ट्रगीत वाजवले जायचे. यातून प्रेरणा घेत नलगोंडाच्या ‘जन गण मन उत्सव’ समितीने याची सुरुवात केली. शहरात राष्ट्रगीत सुरू असताना शहरातील विविध भागांत समितीचे कार्यकर्ते तिरंगा घेऊन उभे असतात. जानेवारी 2021 मध्ये याची प्रथम चाचणी घेण्यात आली. स्थानिक अधिकार्‍यांनी या समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले. या शहराच्या विविध भागांमध्ये 12 मोठे लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत, जेणेकरून जवळपास राहणारे लोक राष्ट्रगीत ऐकू शकतील आणि त्यांचे काम सोडून उभे राहून राष्ट्रगीत गाऊ शकतील.

येत्या काही दिवसांत शहरातील इतर भागातही लाऊडस्पीकर लावण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती आहे. दररोज राष्ट्रगीताचा मान राखणे हा त्यांचा उद्देश असल्याचा स्थानिकांचा दावा आहे.

Back to top button