तडका : म्हातारा इतुका न… | पुढारी

तडका : म्हातारा इतुका न...

महाराष्ट्राला उत्कृष्ट नाटकांची मोठीच परंपरा आहे, हे आपणा सर्वांना माहीत आहे. ‘म्हातारा इतुका न अवघें पाऊणशें वयमान’ हे महाराष्ट्रातील लोकांना चांगल्यापैकी माहिती आहे. जरठ कुमारी विवाह म्हणजे म्हातारा नवरा आणि तरुण नवरी यासंदर्भात असलेल्या एका प्रसिद्ध नाटकामधील हे पद आहे. या नाटकामध्ये 75 वर्षीय वराचे लग्न शोडषवर्षीय तरुणीबरोबर लावून देण्याचा प्रयत्न केला जातो. फार पूर्वी असे प्रकार होत असत. आजकाल असे घडत नाही असे नाही. वधू आणि वर यांच्यामध्ये चक्क वीस- पंचवीस वर्षांचे अंतर असले, तरी विवाह केले जातात. शेवटी प्रत्येक गोष्टीचे एक वय असते. राजकारणामध्ये मात्र कितीही वय झाले, तरी खुर्ची सोडायची तयारी नसते. हे केवळ भारतातच घडते असे नाही, तर सर्वत्र घडत असते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे 81 वर्षांचे आहेत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे पण 77 वर्षांचे आहेत. कुणाचेही असले तरी शेवटी शरीर थकत जाते आणि शरीर थकल्याची चिन्हे त्या व्यक्तीच्या प्रकृती, स्वभाव आणि दैनंदिन बाबींमध्ये ठळकपणे दिसून येतात. मध्यंतरी एका पत्रकार परिषदेमध्ये बायडेन हे हमास या अतिरेकी संघटनेचे नाव विसरले. विसरले म्हणण्यापेक्षा त्यांना ते पटकन आठवले नाही. पटकन न आठवणे हा प्रकार उतारवयात साधारणत: साठीच्या आसपास सुरू होतो. त्यांना ते नाव आठवले असते;

पण संध्याकाळपर्यंत किंवा दुसर्‍या दिवशी. असाच प्रकार दोन-तीनदा घडल्यानंतर बायडेन महोदयांना स्मृतिभ्रंश झाला आहे की काय, याविषयी साक्षात स्वतः ट्रम्प यांनीच शंका व्यक्त केली. प्रतिस्पर्ध्याच्या स्मृतीबद्दल शंका व्यक्त करण्याचा ट्रम्प यांना जरूर अधिकार आहे; पण वारंवार असे प्रकार घडल्यामुळे मीडियामध्ये बायडेन यांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेविषयी चर्चा सुरू झाली. जगातील सर्वात ताकदवान देशाचा अध्यक्ष विसराळू होत असेल, तर ती अमेरिकेसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी चिंतेची बाब असणार आहे. स्मृतिभ्रंश चाचणीला बायडेन यांना आता सामोरे जावे लागणार आहे, असे दिसते.

ही चाचणी जगामध्ये विविध पद्धतीने केली जाते; परंतु प्राण्यांची चित्रे पाहून प्राणी ओळखणे ही मान्यताप्राप्त चाचणी आहे. आता बायडेन महोदयांना वाघ, सिंह, हत्ती,घोडा, जिराफ, मुंगूस, कुत्रा, मांजर, डुक्कर किंवा कोणत्याही प्राण्याचे चित्र दाखवले जाईल आणि तो प्राणी कोणता, हे त्यांना ओळखावे लागणार आहे.

याबाबतीत चीनमधील सत्ताधारी पक्षाची वेगळीच तर्‍हा आहे. तेथील राष्ट्राध्यक्ष हे सहसा 80 वर्षांच्या पुढील असतात आणि पुढे अनेक वर्षे ते सत्ता चालवत असतात. माओ त्से तुंग किंवा डेंग झियाओ पिंग हे तर 90 वर्षांचे होईपर्यंत सत्तेत होते. विद्यमान अध्यक्ष शि जिनपिंग हेही वयोवृद्ध आहेत.

बरेचदा राष्ट्राध्यक्ष खूप थकल्यानंतर त्यांच्या प्रकृतीविषयी नेमकी माहिती चीनमध्ये बाहेर येत नाही. दोन-दोन वर्षे राष्ट्राध्यक्ष कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नाहीत, मग कधीतरी काही मिनिटांसाठी त्यांचे दर्शन होते आणि त्यांना त्या व्यासपीठावरून दूर नेले जाते. आपल्या देशातील स्थिती फारशी काही वेगळी नाही. येथील राजकीय लोकांना मोह सुटत नाही.

Back to top button