शाहबाज शरीफ पाकचे नवे पंतप्रधान? | पुढारी

शाहबाज शरीफ पाकचे नवे पंतप्रधान?

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तान मुस्लिम लीगचे (एन) नेते तसेच माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांचे धाकटे बंधू तसेच माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे नाव जाहीर केले आहे. पक्षाच्या प्रवक्त्या मरियम औरंगजेब यांनी ही माहिती दिली.

नवाज यांच्या कन्या मरियम नवाज या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असतील, असेही मरियम औरंगजेब यांनी सांगितले. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे, असे पीपीपीच्या वतीने सांगण्यात आले. पीएमएलला (एन) पीपीपी बाहेरून पाठिंबा देईल. सरकारमध्ये मात्र सहभागी होणार नाही, असे स्वत: बिलावल भुट्टो यांनी स्पष्ट केले. मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटसह अन्य काही लहानसहान पक्षांनी तसेच काही अपक्षांनीही पीएमएलला (एन) आधीच पाठिंबा जाहीर केलेला आहे. या सगळ्यांचे नवाज शरीफ यांनी आभार मानले आहेत.

बिलावल म्हणाले…

मला आणि माझ्या पक्षाला देशात कोणतीही नवी समस्या पाहायची नाही. फेरनिवडणूकही नको आहे.
सिनेटचे, राष्ट्रीय संसदेचे अध्यक्ष मात्र आमच्या पक्षाचे असतील. देशाला संकटातून बाहेर काढायचे आहे.

इम्रान खान यांचा संदेश

इम्रान खान यांनी कारागृहातून संदेश पाठवला आहे. पीएमएलएन, पीपीपीशी आम्ही कुठल्याही परिस्थितीत चर्चा करणार नाही, असे त्यात म्हटलेले आहे. विरोधात बसण्याची तयारी इम्रान यांनी आधीच दर्शविलेली आहे.

Back to top button