ST strike : एसटी कामगार संघटनेचे उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढवणार | पुढारी

ST strike : एसटी कामगार संघटनेचे उपोषण; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढवणार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : एसटी कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा होऊनही त्यावर कार्यवाही झाली नसल्याने राज्यभरात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने बेमुदत उपोषण आंदोलन सुरु केले आहे. मंगळवारपासून राज्यातील एसटीच्या विभागीय कार्यालयाबाहेर तर मुंबईत आझाद मैदानात उपोषण सुरु केले आहे. एसटी महामंडळासह राज्य सरकारने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. ( ST strike )

संबंधित बातम्या 

एसटी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांवर निर्णय झाले आहेत. परंतु, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. यात महागाई भत्त्याची, घरभाडे भत्त्याची व वार्षिक वेतनवाढीची वाढीव दराची थकबाकी देण्याबाबत 15 दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांच्या उपस्थितीत मान्यताप्राप्त कामगार संघटनेसमवेत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे मान्य केले होते. परंतु चार महिन्यांचा कालावधी संपूनही अद्याप बैठक झालेली नाही. अन्य आर्थिक मागण्यांवरही निर्णय झाला नाही.

कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करणे व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची प्रलंबित देणी यावर मान्यताप्राप्त संघटनेसमवेत चर्चा करून समितीने अहवाल शासनास 60 दिवसांत सादर करण्याचे मान्य केले. परंतु, कालावधी संपूनही अहवाल सादर झालेला नाही. यामुळे उपोषण सुरु करण्यात आले आहे. ( ST strike )

Back to top button