’बॉटल नेक’मुळे वाहतूक कोंडी : रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी | पुढारी

’बॉटल नेक’मुळे वाहतूक कोंडी : रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी

वडगाव शेरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने नगर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी येरवडा ते विमाननगर या दरम्यानचा बीआरटी मार्ग काढला आहे. परंतु ‘बॉटल नेक’मुळे शास्त्रीनगर, रामवाडी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक (हयात हॉटेल) आणि विमाननगर फिनिक्स मॉलच्या सिग्नलवर वाहनांच्या रांगा लागतात. या ठिकाणी रस्ता रुंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
नगर रोडवर बीआरटी मार्गामुळे वाहतूक कोंडी होत होती. यामुळे महापालिकेने या रस्त्यावरील येरवडा ते विमाननगर दरम्यानचा बीआरटी मार्ग काढला असल्याने रस्त्याची एक लेन वाढली आहे. परिणामी वाहनांचा वेग वाढला आहे.

मात्र, चौकांमधील ‘बॉटल नेक’ रस्त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. शास्त्रीनगर चौक, रामवाडी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, फिनिक्स मॉल येथील चौकामध्ये रस्ता रुंदीकरण झाले नाही. त्यामुळे या चौकामधील सिग्नलवर दोनशे ते तीनशे मीटर वाहनांच्या रांगा लागतात. चौकांतील रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन बाकी असल्याचे सांगितले जाते. महापालिकेने बीआरटी मार्ग काढला आहे. त्याच धर्तीवर चौकांमधील ‘बॉटेल नेक’ असलेल्या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण केल्यास सिग्नलवरील वाहनांच्या रांगा कमी होतील.
याबाबत महापालिकेचे पथ विभागाचे अधिकारी उपेंद्र वैद्य यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

अधिकार्‍यांच्या पाहणीनंतरही कार्यवाही नाही

रामवाडी सिग्नलपासून वाहने वेगाने जातात. पुढे शास्त्रीनगर चौकामध्ये वाहनाच्या रांगा लागतात. तसेच, येरवड्याकडून खराडीकडे जाताना शास्त्रीनगर चौक, फिनिक्स मॉल आणि रामवाडी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथेही वाहतूक कोंडी होत आहे. काही महिन्यांपूर्वी महापालिका अधिकार्‍यांनी ‘बॉटल नेक’च्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्यासाठी जागेची पाहणी केली होती. पण, नंतर पुढे काहीच कार्यवाही झाली नसल्याचे शिवसाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश गलांडे यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button