रस्ता ओलांडताना नागरिकांचा जीव मुठीत; स्कायवॉक उभारण्याची मागणी | पुढारी

रस्ता ओलांडताना नागरिकांचा जीव मुठीत; स्कायवॉक उभारण्याची मागणी

दीपक नायक

वाघोली : वाघोली येथे नगर महामार्गावर नित्याचीच वाहतूककोंडी होत आहे. रस्ता ओलांडण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. वाहनांच्या गर्दीतून जीव मुठीत धरून त्यांना रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी स्कायवॉक करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाघोलीकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वर्षानुवर्षे वाहतूक कोंडीवर उपयायोजना करण्यासाठी बैठकांचा फार्स पार पडत आहे. मात्र, बैठकांतील निर्णयांची अंमलबजावणी मात्र होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

वाघोलीचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर स्वतंत्र वाहतूक विभाग मिळाल्याने वाहतूक कोंडी कमी होईल, असे नागरिकांना वाटले होते. परंतु, त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. वाहतुकीची समस्या सोडविण्याबाबत पोलिस अधिकारी, नगर रस्ता इंडस्ट्रीज असोसिएशन, विविध विभागांचे अधिकारी यांच्या उपस्थितीत अनेक बैठका झाल्या. यात स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी काही उपाययोजना सुचविल्या होत्या. परंतु, त्याची अद्यापही अंमलबजावणी झाली नाही. दररोज होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थी व नागरिकांना जोखीम पत्कारून रस्ता ओलांडावा लागत आहे. यामुळे नगर महामार्गावर सातव हायस्कूल, केसनंद फाटा, फडई चौक या ठिकाणी स्कायवॉक झाल्यास रस्ता ओलांडणे सोयीचे होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

बेशिस्त वाहतुकीमुळे कोंडीत भर

केसनंद फाटा, लोहगाव रोड, बकोरी फाटा, तुळापूर चौक आदी ठिकाणांहून प्रवाशांची खासगी वाहनांतून अवैध वाहतूक केली जात आहे. ही वाहने रस्त्यामध्ये उभी केली जातात. तुळापूर फाट्यावरील हॉटेलसमोर उभ्या असलेल्या वाहनांनी बहुतांश रस्ता व्यापला जात आहे. वाघेश्वर चौक, आव्हाळवाडी चौक, केसनंद फाटा, बकोरी फाटा, तुळापूर चौक या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. फडई चौकापासून ते केसनंद फाटा, वाघेश्वर बसथांबा ते भारत पेट्रोल पंप परिसरातील रस्त्याच्या दोन्हीही बाजूने बेशिस्त वाहने लावली जातात. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

शाळेत जाताना व येताना वाहने वेगाने येतात. त्यामुळे खूप भीती वाटते. सरकारने लवकरात लवकर वाघोतीत स्कायवॉक उभारणे गरजेचे आहे.

– वैभव जावडे, ज्ञानेश्वर साटे, विद्यार्थी

वाघोली येथे तीन माजली उड्डाणपूल होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी वेळ
लागणार असल्याने नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी स्कायवॉक उभारणे गरजेचे आहे.

– विक्रम वाघमारे, रहिवासी

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचआय) नगर महामार्गाचा प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. यामुळे सार्वजनिक बांधकम विभागाला या ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजन
करणे शक्य होणार नाही.

-मिलिंद बारभाई, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

हेही वाचा

Back to top button